कडेगावच्या सरपंचपदी राजू जाधव यांची निवड
By Admin | Updated: August 9, 2015 00:47 IST2015-08-09T00:32:19+5:302015-08-09T00:47:36+5:30
काँग्रेसची बाजी : मनोज मिसाळ उपसरपंच

कडेगावच्या सरपंचपदी राजू जाधव यांची निवड
कडेगाव : कडेगावच्या सरपंचपदी काँग्रेसचे प्रशांत ऊर्फ राजू भीमराव जाधव यांची, तर उपसरपंचपदी काँग्रेसचेच मनोजकुमार पोपट मिसाळ यांची शनिवारी निवड झाली. सरपंच, उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने नऊ विरुध्द आठ मतांनी बाजी मारली.
काठावरचे बहुमत असल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी लक्ष घातले आणि शनिवारी सरपंच, उपसरपंच निवडीसाठी काँग्रेस सदस्यांची बैठक घेतली. सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. बैठकीत सरपंच पदासाठी एकमत होत नव्हते. काँग्रेसचे अजित कोळी यांनी, तर आघाडीकडून मंगल चन्ने यांनी सरपंच पदासाठी अर्ज भरला. काँग्रेसचे राजू जाधव यांनीही सरपंच पदासाठी अर्ज भरला. विशेष म्हणजे राजू जाधव यांना आघाडीचे सुरेश देशमुख सूचक आहेत.
राजू जाधव यांनी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने त्यांचा सरपंच पदासाठी अर्ज ठेवला, तर अजित कोळी यांनी अर्ज माघारी घेतला. यामुळे काँग्रेसचे राजू जाधव व आघाडीच्या मंगल चन्ने यांच्यात सरपंच पदासाठी निवडणूक झाली, त्याचवेळी काँग्रेसचे मनोज मिसाळ व आघाडीचे युन्नूस पटेल यांच्यात उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. गुप्त मतदान झाले. यात सरपंच व उपसरपंच पदासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना ९, तर आघाडीच्या उमेदवारांना ८ मते मिळाली. सरपंचपदी प्रशांत ऊर्फ राजू जाधव यांची, तर उपसरपंचपदी मनोजकुमार मिसाळ यांची निवड जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (वार्ताहर)