गुंडगिरीविरोधात राजेंची गांधीगिरी
By Admin | Updated: November 9, 2014 23:38 IST2014-11-09T23:10:59+5:302014-11-09T23:38:06+5:30
बुधवारी उपोषण : ‘जलमंदिर’वर आलेल्या तक्रारींनुसार कारवाईची मागणी

गुंडगिरीविरोधात राजेंची गांधीगिरी
सातारा : साताऱ्यातील गुंडगिरीविरोधात खासदार उदयनराजे भोसले यांनी आता गांधीगिरीचे शस्त्र उगारले आहे. ‘जलमंदिर’ या त्यांच्या निवासस्थानी प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये नावे असणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हे दाखल न केल्यास येत्या बुधवारी (दि. १२) जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत उदयनराजेंनी दिलेल्या उपोषणाच्या नोटिसीत म्हटले आहे की, साताऱ्यात सध्या गुंडगिरी वाढत आहे. व्यावसायिक, महिला, विद्यार्थी आणि समाजात असंतोषाचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रत्येकाला निर्भयपणे जगणे आणि व्यवसाय करण्याचा अधिकार घटनेने दिला असून, त्यावरच गुंडगिरीमुळे गदा येत आहे. याबाबत कठोर कारवाई पोलीस प्रशासनाने केली पाहिजे, अशी जनतेची धारणा आहे.
उदयनराजेंनी केलेल्या आवाहनानुसार ‘जलमंदिर’ येथे लेखी स्वरूपात प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार संबंधितांवर दखलपात्र गुन्हे दाखल केल्याखेरीज लाक्षणिक उपोषणाचा निर्णय मागे घेणार नाही, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनाही त्यांनी या लाक्षणिक उपोषणाची माहिती दिली असून, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानीही त्यांनी ‘फॅक्स’ पाठविला आहे, असे पत्रकात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
नागरिकही सहभागी होणार
खासदार उदयनराजे भोसले यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नागरिकही मोठ्या संख्येने त्यांच्यासह उपोषणात सहभागी होणार आहेत. गुंडगिरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याच्या मागणीसाठीच हे आंदोलन असल्याने उदयनराजेंना पाठिंबा म्हणून नागरिक सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.