राजारामबापू दूध संघाने संकलन आणि दूूध विक्रीत वाढ करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST2021-03-24T04:24:27+5:302021-03-24T04:24:27+5:30
राजारामबापू दूध संघाच्या वार्षिक सभेत जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विनायकराव पाटील, शामराव पाटील, प्रतीक पाटील, बी. के. ...

राजारामबापू दूध संघाने संकलन आणि दूूध विक्रीत वाढ करावी
राजारामबापू दूध संघाच्या वार्षिक सभेत जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विनायकराव पाटील, शामराव पाटील, प्रतीक पाटील, बी. के. पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोनामुळे सर्वच उद्योगात मंदीचे वातावरण आहे. या परिस्थितीत राजारामबापू दूध संघाने संकलन आणि दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीमध्ये वाढ करण्याचे नियोजन करावे तसेच सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून विजेच्या खर्चामध्ये बचत करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन दूध संघाचे मार्गदर्शक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
येथील राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाची ४६ वी वार्षिक साधारण सभा जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने झाली. संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या सभेत ५० संस्था प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. यावेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष युवा नेते प्रतीक पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
विनायकराव पाटील यांनी प्रास्ताविकात प्रतिकुल परिस्थितीमध्येही जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने उत्तम कामगिरी केली आहे. प्रतीक पाटील यांच्या सूचना विचारात घेऊन वीजबचतीसाठीचे यशस्वी प्रयत्न केले आहेत. संघाची एकूण उलाढाल ३८१ कोटी रुपयांची झाली आहे. तालुक्यात संघाने ४२ गावांसाठी ९ बल्क कुलर बसविले आहेत तर ८ बीएमसी सुविधा बसविण्याचे काम सुरू आहे, असे स्पष्ट केले.
दूध संघाची वार्षिक सभा ही शासनाच्या कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून संघ कार्यस्थळावर घेण्यात आली. संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी स्वागत केले.
प्रतीक पाटील म्हणाले, संघाची कामाची पद्धत समजून घेऊन संघाच्या कामकाजामध्ये काही बदल सुचविले आहेत त्यामुळे संघास फायदा होणार आहे. यावेळी जोगेश्वरी सह. दूध संस्था (माणिकवाडी) या संस्थेस ‘आदर्श दूध संस्था पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
कार्यकारी संचालक बी. बी. भंडारी यांनी सभेचे नोटीस वाचन केले. कार्यालयीन अधीक्षक लालासाहेब साळुंखे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. उपसरव्यवस्थापक पी. डी. साळुंखे यांनी आर्थिक पत्रकाचे वाचन केले. वित्त व्यवस्थापक बी. ए कोरे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. पोपट कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी संग्राम फडतरे, नेताजीराव पाटील, विलासराव पाटील, उदय पाटील, पोपटराव जगताप, बबनराव सावंत, विकास कांबळे, अनिल खरात,अल्लाउद्दीन चौगुले, रमेश पाटील उपस्थित होते.