‘राजारामबापू’ची साखर रोखली
By Admin | Updated: January 2, 2015 00:11 IST2015-01-01T23:07:44+5:302015-01-02T00:11:47+5:30
शेतकरी संघटना : पहिली उचल साडेतीन हजार रुपये न दिल्याने आंदोलन

‘राजारामबापू’ची साखर रोखली
इस्लामपूर : उसाला साडेतीन हजार रुपयांची पहिली उचल न दिल्यामुळे आज (गुरुवारी) शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू कारखान्यातून साखर भरून बाहेर पडणारे पाच कंटेनर रोखून धरले. दीड तास कार्यकर्त्यांनी तेथे तळ ठोकला होता. कंटेनर चालक व आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील, इकबाल जमादार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. रघुनाथदादा पाटील यांनी आठ दिवसांपूर्वीच, कारखान्यांनी साडेतीन हजार रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय न घेतल्यास १ जानेवारीपासून साखर, पेट्रोल व डिझेल वाहतूक, विक्री रोखून धरण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज दुपारी ‘राजारामबापू’च्या परिसरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धडक मारून हे आंदोलन केले. दीड तास साखरेचे कंटेनर कार्यकर्त्यांनी रोखून धरले होते. त्यानंतर कारखाना परिसरातील डिझेल व पेट्रोल पंपावर जाऊन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तेथील विक्री व्यवहारही बंद पाडला. उसाला साडेतीन हजारांची उचल दिली नाही, तर आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील म्हणाले की, जोपर्यंत शासन साखर विक्रीचा दर ४० रुपये प्रतिकिलो असा करत नाही, तसेच इथेनॉलला ६० रुपये प्रतिलिटर दर देऊन त्याचा पेट्रोलमध्ये वापर करण्यास परवानगी देत नाही, तोपर्यंत साखर कारखानदारांनी साखर विक्री करू नये. वरील दोन्ही बाबींना शासनाने मान्यता दिली, तर उसाला साडेतीन हजार रुपयांची पहिली उचल देणे शक्य आहे. याचा शासन आणि कारखानदारांनी गांभीर्याने विचार करावा. हा निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकरी संघटनेच्यावतीने हे आंदोलन सुरुच राहील. यापुढच्या टप्प्यात साखरेचे कंटेनर व पेट्रोल, डिझेलचे कंटेनर पेटवून देऊ. शंकरराव मोहिते, एकनाथ निकम, सुभाष पाटील, आर. एस. पाटील, महादेव पवार, विश्वास मोकाशी, धनपाल माळी यांनी आंदोलनात सहभाग घेतला. (वार्ताहर)
चालक व आंदोलकांत शाब्दिक चकमक
राजारामबापू कारखान्यातून साखर भरून बाहेर पडणारे पाच कंटेनर रोखून धरले. सुमारे दीड तास कार्यकर्त्यांनी तेथे तळ ठोकला होता. कंटेनर चालक व आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. पेट्रोल व डिझेल पंपावरील विक्रीही काही काळ बंद पाडली.
आंदोलकांनी पाच कंटेनर रोखून धरले