राजारामबापू दूध संघाची निवडणूक बिनविरोध
By Admin | Updated: May 23, 2015 00:30 IST2015-05-22T23:19:35+5:302015-05-23T00:30:40+5:30
पंधरा उमेदवारांची माघार : अकरा विद्यमान, तर सात नव्या चेहऱ्यांना संधी

राजारामबापू दूध संघाची निवडणूक बिनविरोध
इस्लामपूर : राजारामबापू दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक अपेक्षेनुसार बिनविरोध झाली. शुक्रवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्यामुळे संघाच्या कार्यस्थळावर ठाण मांडून बसलेल्या आ. जयंत पाटील यांनी शेवटच्या दोन मिनिटात विद्यमान उपाध्यक्ष संग्राम फडतरे यांच्यासह तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुस्मिता जाधव यांचे अर्ज मागे घेण्याची सूचना करत धक्का दिला. नव्या संचालक मंडळात ११ विद्यमान, तर ७ नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली.
दूध संघाच्या कार्यस्थळावरील निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. देसाई व सहायक अधिकारी एस. व्ही. लोंढे यांच्यासमोर ही अर्ज माघारीची प्रक्रिया झाली. संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी एकूण ३३ उमेदवारी अर्ज होते. छाननीत हे सर्व अर्ज वैध ठरले. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत १५ उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. तीनशे कोटींची उलाढाल असणाऱ्या दूध संघावर संचालक म्हणून जाण्यासाठी बऱ्याचजणांनी बरीच खळबळ केली. मात्र संघाचे मार्गदर्शक आ. जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतच पाच संचालकांना ‘आऊट’ केल्याने अर्ज माघारीपर्यंत आणखी किती जणांवर गंडांतर येईल, याची धाकधूक अर्ज राहिलेल्यांच्या मनात होती. शेवटी जयंत पाटील यांनी विद्यमान उपाध्यक्ष फडतरे व संचालिका सुस्मिता जाधव यांना संघाच्या पटावरून पायउतार करुन एकूण सात संचालकांना थांबवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली. नव्या संचालक मंडळात विद्यमान अध्यक्ष नेताजीराव पाटील (तांबवे), विनायकराव पाटील (ताकारी), अशोकराव पाटील (बोरगाव), विलासराव पाटील (कुरळप), उदयसिंह पाटील (कासेगाव), जगन्नाथ पाटील (भडकंबे), सोमराज देशमुख (चिकुर्डे), रमेश पाटील (भवानीनगर), सुनीता देशमाने (पेठ), विकास कांबळे (येडेनिपाणी), उज्ज्वला पाटील (आष्टा) या जुन्या संचालकांसह मंगल बाबर (तुजारपूर), प्रशांत थोरात (वाळवा), बाळासाहेब पाटील (इस्लामपूर), बबनराव सावंत (नरसिंहपूर), शशिकांत पाटील (ठाणापुडे), बजरंग खोत (गाताडवाडी), अनिल खरात (खरातवाडी) अशा सात नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला आहे. (वार्ताहर)
जयंतरावांचे धक्कातंत्र
नवीन संचालक निवडत असताना जुन्याजाणत्या संचालकांवर अंकुश राहावा, अशी व्यवस्था करीत जयंत पाटील यांनी विद्यमान संचालक मंडळातील सात संचालकांना बाहेरचा रस्ता दाखवला. आज अर्ज माघारीच्या दिवशी त्यांच्या रडारवर चार संचालक होते. त्यातील उपाध्यक्ष फडतरे व संचालिका सौ. जाधव यांच्यावर अर्ज माघारीची कुऱ्हाड कोसळली. सरकार आणि एक पाहुणेसुध्दा या यादीत होते. मात्र संघात असलेल्या पाहुण्यांच्या मांदियाळीने हे संकट परतवून लावण्यात यश मिळविले.