राजारामबापू बॅँकेत १६ लाखांचा अपहार
By Admin | Updated: November 9, 2016 00:46 IST2016-11-09T00:46:46+5:302016-11-09T00:46:46+5:30
आष्टा शाखेतील प्रकार : कर्मचाऱ्यांकडून फसवणूक; बॅँकेची पोलिसात तक्रार

राजारामबापू बॅँकेत १६ लाखांचा अपहार
आष्टा : राजारामबापू बँकेच्या आष्टा शाखेतील कर्मचाऱ्यांनीच बनावट खाते तयार करून १६ लाख ७५ हजार रुपयांचा अपहार केला आहे. ही घटना २६ जुलै २०१६ ते ७ आॅक्टोबर २०१६ अखेर घडली. बॅँकेतील लिपिक विश्वास रामचंद्र खोत (रा. शिरटे, ता. वाळवा), पासिंग आॅफिसर शीतल बाळासाहेब पाटील (रा. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा), सुरेखा महेश पाटील (रा. गव्हाणवाडी, ता. वाळवा) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत शाखाधिकारी सुनील यशवंत पाटील (रा. कार्वे, ता. वाळवा) यांनी आष्टा पोलिसात फिर्याद दिली आहे.
आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेठ येथील राजारामबापू सहकारी बँकेची आष्टा येथील ज्योतिर्लिंग चौकानजीक शाखा आहे. या शाखेच्या कार्यालयात विश्वास खोत हे लिपिक, पासिंग आॅफिसर शीतल पाटील व सुरेखा पाटील हे कर्मचारी आहेत. या शाखेत खातेदार असलेल्या सुरेखा महेश पाटील (रा. शिगाव, ता. वाळवा) यांचे अनामत खाते (क्र. ३०९१०६/५६/१२) आहे. या खात्यावर राजारामबापू कारखान्याकडून जमा झालेले १६ लाख ८६ हजार ४८२ रुपये होते. विश्वास खोत, शीतल पाटील यांनी त्याच नावाच्या सहकारी कर्मचारी सुरेखा महेश पाटील (रा. गव्हाणवाडी) यांचे बनावट खाते (क्र. १११७३) तयार केले. या खात्यावर खोत व पाटील यांनी स्वत:चे अधिकार वापरून २६ जुलै २०१६ ते ७ आॅक्टोबर २०१६ या कालावधित १६ लाख ८६ हजार ४८२ रुपये परस्पर जमा केले आहेत. त्यानंतर धनादेश वापरून या खात्यावरील १६ लाख ७५ हजार रुपये काढून घेऊन बँकेची फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सावंत करीत आहेत.
आॅडिट कमिटीच्या
बैठकीनंतर उलगडा
सुरेखा महेश पाटील (रा. शिगाव) यांच्या अनामत खात्यावर (क्र. ३०९१०६) राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याकडून १६ लाख ४८२ रुपये जमा करण्यात आले होते. ही रक्कम कोणाच्या नावे टाकू नये, म्हणून ‘डेबिट फ्रीझ’ करून ठेवली होती. ६ आॅक्टोबर २०१६ रोजी बँकेच्या पेठ येथील मुख्य शाखेत आॅडिट कमिटीची बैठक होती. या बैठकीत शाखेच्या अनामत खात्याची माहिती तयार करताना सुरेखा पाटील यांच्या खात्यावरील रक्कम कमी झाल्याचे शाखाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर बँकेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
(वार्ताहर)