‘टेंभू’साठी पवनचक्क्या उभारा

By Admin | Updated: October 3, 2015 23:49 IST2015-10-03T23:49:49+5:302015-10-03T23:49:49+5:30

खानापुरातील ४० ग्रामसभांचा ठराव : कृती समितीच्या आवाहनास प्रतिसाद

Raise windmills for 'Tembhu' | ‘टेंभू’साठी पवनचक्क्या उभारा

‘टेंभू’साठी पवनचक्क्या उभारा

विटा : शासनाने टेंभू योजनेच्या विजेसाठी खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावर पवनचक्क्या व सौर ऊर्जा प्रकल्प उभारावेत, अशा मागणीचा ठराव शुक्रवारी खानापूर तालुक्यातील सुमारे ४० गावांच्या ग्रामसभेत करण्यात आला. खानापूर तालुका टेंभू योजना कृती समितीच्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळाला असून, टेंभूच्या लाभक्षेत्रात नसलेल्या गावांच्या समावेशासाठीही शुक्रवारी वंचित गावांनी ग्रामसभेत ठराव करून हे ठराव शासन व कृष्णा खोरे विकास महामंडळाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
दुष्काळी खानापूर तालुक्याला वरदान ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या टप्पा क्र. ३ अ, ३ ब, तसेच टप्पा क्र. ४ व ५ मधून शेतकऱ्यांना विद्युत पंपाव्दारे पाणी उचलून द्यावे लागणार आहे. त्यामुळे वीज बिल व अन्य खर्च विचारात घेता टेंभूची पाणीपट्टी आकारणी जास्त होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर हा ठराव करण्यात आला.
खानापूर तालुक्यातील काही गावे टेंभू योजनेपासून वंचित आहेत, तर अनेक गावांना पूर्णपणे या योजनेच्या पाण्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे टेंभू योजनेतील दोष दुरूस्त करावेत तसेच वंचित गावे व लाभक्षेत्राचा समावेश टेंभू योजनेत करावा, यासाठी खानापूर तालुका टेंभू योजना कृती समितीने तालुक्यात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. श्विाय टेंभू योजनेच्या विजेसाठी पवनऊर्जा व सौरऊर्जा प्रकल्प उभारून त्याचा खर्च टेंभू प्रकल्प खर्चात समाविष्ट करावा, अशी मागणी कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबत कृती समितीने शुक्रवार, दि. २ आॅक्टोबरच्या ग्रामसभेत याबाबतचे ठराव मंजूर करून घेऊन शासन व कृष्णा खोरे विकास मंडळाला पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार खानापूर तालुक्यातील सुमारे ४० गावांनी ग्रामसभेत टेंभू योजनेत समावेश व पवनऊर्जा प्रकल्प उभारणीबाबत ठराव घेऊन ते एकमताने मंजूर केले. हे सर्व ठराव खानापूर तालुका टेंभू योजना कृती समितीच्यावतीने शासनाला पाठविण्यात येणार आहेत.
याबाबत ठोस निर्णय न झाल्यास किंवा वंचित गावांचा टेंभू योजनेत समावेश न झाल्यास रस्त्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी ग्रामसभेत घेतला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. (वार्ताहर)
 

Web Title: Raise windmills for 'Tembhu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.