आरक्षण उठवा, अन्यथा धडा शिकवू
By Admin | Updated: December 15, 2015 23:27 IST2015-12-15T22:48:28+5:302015-12-15T23:27:30+5:30
महापालिकेवर मोर्चा : गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीचा इशारा

आरक्षण उठवा, अन्यथा धडा शिकवू
सांगली : महापालिकेच्या विकास आराखड्यात रहिवासी क्षेत्रावर आरक्षण टाकताना सत्ताधारी झोपले होते का, असा सवाल करीत, आरक्षित जागेवरील आरक्षणे तातडीने उठवा, अन्यथा सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्यावतीने मंगळवारी मोर्चाद्वारे देण्यात आला. गुंठेवारी भागातील आरक्षणाविरोधात संघर्ष समितीच्यावतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व चंदन चव्हाण, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, शहराध्यक्ष अमर पडळकर, माजी नगरसेवक पृथ्वीराज पवार, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी केले.
यावेळी चंदन चव्हाण म्हणाले की, गेली २५ वर्षे गुंठेवारीतील नागरिकांना भूलथापा मारल्या जात आहेत. विकास आराखडा तयार करताना गुंठेवारीतील रहिवासी क्षेत्रावर आरक्षणे टाकण्यात आली. ही आरक्षणे उठविण्याचा ठराव महापालिकेने करावा, अन्यथा गुंठेवारीतील नागरिक नगरसेवकांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत. तानाजी सावंत म्हणाले की, वाचाळवीर महापौरांनी गुंठेवारीतील नागरिकांविरोधात बेताल व्यक्तव्ये बंद करावीत. त्यांनीच अतिक्रमण केले आहे. ते पाडण्याचे धाडस महापालिकेने दाखवावे. आम्ही घाबरण्यासाठी नव्हे, तर महापौरांना घाबरविण्यासाठी आलो आहोत. गुंठेवारीतील एकाही घराला हात लावू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पृथ्वीराज पवार म्हणाले की, विकास आराखडा तयार करताना राहत्या घरांवर आरक्षणे टाकल्याचे दिसले नाही का? काहीजण आराखड्याची भीती घालून नागरिकांना फसविण्याचा उद्योग करीत आहेत. अमर पडळकर म्हणाले की, गुंठेवारीतील घरांवर हातोडा मारण्यापेक्षा गुंठेवारीचे पैसे अडकलेल्या वसंतदादा बँकेवर हातोडा टाकावा. गुंठेवारीतील आरक्षणे उठत नाहीत तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, संदीप टेंगले, आशिष कोरी, अजिंक्य पाटील, शहाजी भोसले, सुरेश टेंगले, अजय माने, अजित दुधाळ उपस्थित होते. (प्रतिनिधी)