मॉडेल स्कूलसाठी लोकसहभागातून निधी उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:58 IST2021-09-02T04:58:33+5:302021-09-02T04:58:33+5:30
आटपाडी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा नावीन्यपूर्ण करण्यासाठी शाळेत शैक्षणिक व भौतिक सोयी-सुविधा निर्माण करू. आटपाडी तालुक्यातील १४ शाळा ...

मॉडेल स्कूलसाठी लोकसहभागातून निधी उभारा
आटपाडी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा नावीन्यपूर्ण करण्यासाठी शाळेत शैक्षणिक व भौतिक सोयी-सुविधा निर्माण करू. आटपाडी तालुक्यातील १४ शाळा मॉडेल स्कूल म्हणून उभारण्यात येणार आहेत. यासाठी गावाने लोकसहभागातून मोठा निधी उभा करण्याचे आवाहन आटपाडीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी केले.
आटपाडी तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक याची आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी ते बोलत होते. सहायक गटविकास अधिकारी सचिन भोसले, उपअभियंता शेंडगे, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक म्हेत्रे प्रमुख उपस्थित होते.
मनोज भोसले यांनी, आपल्या गावातील शाळा शैक्षणिक व भौतिक सोयी-सुविधांनी परिपूर्ण होतील, याकडे सरपंच व ग्रामसेवक यांनी लक्ष द्यावे. लोकसहभागातून शाळेला क्रीडा साहित्य, प्रयोगशाळा साहित्य मिळवून देण्यासह शाळा सुशोभिकरणाकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या.
आटपाडी तालुक्यातील आटपाडी शाळा नं १ व २, दिघंची शाळा नं १, निंबवडे शाळा नं १ व २, शेटफळे शाळा नं १, पुजारवाडी (दिघंची), लेंगरेवाडी, बोंबेवाडी, नेलकरंजी, घरनिकी, पिंपरी बु, वलवण, साळशिंग मळा, बनपुरी शाळा १ व २, हिवतड आदी शाळांची या उपक्रमात निवड झाली आहे.