सांगलीत घोषणांचा पाऊस
By Admin | Updated: April 1, 2015 00:02 IST2015-03-31T22:57:33+5:302015-04-01T00:02:53+5:30
महापालिका अंदाजपत्रक : ‘अच्छे दिन’चा विश्वास

सांगलीत घोषणांचा पाऊस
शीतल पाटील - सांगली ‘हयात ले के चलो, कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ ले के चलो...’ असा संकल्प सोडत स्थायी सभापती संजय मेंढे यांनी आज, मंगळवारी महापालिकेच्या ५७३ कोटींच्या अंदाजपत्रकात अनेक नव्या योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडला. पालिकेला अच्छे दिन येणार, असे सांगताना त्यांनी नागरिकांसाठी मोफत विमा, कर्मचारी अपघात निधी, व्हर्टिकल पार्किंग व्यवस्था, राजमाता जिजाऊ कल्याणकारी योजना, अशा अनेक उपक्रमांसाठी मोठी आर्थिक तरतूद केली. गेली दोन वर्षे एलबीटी करामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. आता हे संकट टळल्याने ‘दिल मांगे मोअर’ म्हणून ‘और जादा’ देण्याचा निर्धारही त्यांनी अंदाजपत्रकातून व्यक्त केला आहे. सभापतींनी अनेक नव्या घोषणा केल्या असल्या तरी, भविष्यात त्यांच्या पूर्ततेसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
घनकचऱ्याचा धसका
घनकचऱ्याप्रकरणी हरित न्यायालयाने पालिकेचे वाभाडे काढल्याने त्याचा धसका सत्ताधाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात घेतल्याचे दिसून आले. चिकन, मटण, फिश मार्केट, हॉटेल्स, खानावळी, मंगल कार्यालयातील वेस्टेज, कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात येईल. कचरा संकलित करण्यासाठी घंटागाड्या, कंटेनर्स, डबे खरेदी केले जाणार आहेत. विस्तारित भागात रिक्षा घंटागाडीची योजना राबविली जाणार आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा एकत्र केल्यास दंडात्मक कारवाईची शिफारसही सभापतींनी केली आहे. नागरिकांनी आपला कचरा दुसऱ्याच्या दारात अथवा रस्त्यावर टाकून शहर विद्रुप करू नये, असे आवाहनही मेंढे यांनी केले आहे.
अंदाज शायराना...
स्थायी सभापती संजय मेंढे यांनी शायराना अंदाजात पालिकेचे अंदाजपत्रक सादर केले. ‘आदमी हूॅँ आदमी से प्यार करता हूॅँ, बस यही अपराध मै हर बार करता हूॅँ’, ‘या जगाची त्या जगाला ओढ राहिली नाही, पूर्वीइतकी साखर आता गोड राहिली नाही’, ‘दरिया दरिया प्यास है तेरी, कतरा कतरा मत सोचा कर’ या त्यांच्या शायरीला सदस्यांंनीही बाके वाजवून दाद दिली.
नागरिकांना मोफत विमा
महापालिका क्षेत्रातील पाच ते ७० वयोगटातील नागरिकांसाठी ‘पद्मभूषण वसंतदादा पाटील जनता व्यक्तिगत अपघात विमा योजना’ राबविण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी २ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद केली आहे. या विम्याचे हप्ते महापालिकेकडून भरले जाणार आहेत. अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकास एक लाख रुपयांची मदत मिळेल.
राजमाता जिजाऊ योजना
या योजनेत द्रारिद्र्य रेषेखालील कुटुंबाने एका मुलीवर शस्त्रक्रिया केल्यास त्यांना प्रत्येकी दहा हजार, तर दोन मुलींवर शस्त्रक्रिया केल्यास प्रत्येकी पाच हजाराचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यासाठी २५ लाखांची तरतूद केली आहे. ही योजना राबविणारी सांगली पालिका ही राज्यातील पहिली महापालिका आहे.
अंदाजपत्रकातील अन्य महत्त्वाच्या तरतुदी
हार्डशीप योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एजन्सी
कुपवाडमध्ये उद्यान विकासासाठी ४० लाखांची तरतूद
पालिका कार्यालयात थम यंत्रासाठी २५ लाख
शहरातील क्रीडांगणांच्या विकासासाठी ३० लाख
अपंग व्यक्ती व महिला स्वच्छतागृहांसाठी ५० लाख
नवीन आठवडा बाजारासाठी २५ लाख
प्रत्येक नगरसेवकासाठी १० लाखाची तरतूद
प्रभाग समितीसाठी दोन कोटीची तरतूद
मुख्य रस्त्यावर कमानी उभारण्यासाठी ५० लाख
थोर पुरुषांची स्मारके उभारण्यासाठी २५ लाख
व्हर्टिकल पार्किंग, डिजिटल सिग्नल
शहरात पार्किंगचा प्रश्न भेडसावत आहे. त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न अंदाजपत्रकातून केला आहे. पालिकेच्या जागांवर नवीन अद्ययावत व्हर्टिकल पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. शहरातील मुख्य रहदारीच्या चौकांत डिजिटल सिग्नल बसविण्याचा संकल्पही केला आहे.
सेवक
आकस्मिक दुर्घटना
निधी
पालिकेचे कायम कर्मचारी अनेकवेळा धोकादायक कामे करतात. अशावेळी त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना आधार देण्यासाठी ‘स्थायी समिती सभापती कायम सेवक आकस्मिक दुर्घटना निधी’ची तरतूद करण्यात आली आहे.