शिराळा पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST2021-08-15T04:27:11+5:302021-08-15T04:27:11+5:30
कोकरुड : शिराळा पश्चिम भागात गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या रिमझिम पावसाने शनिवारी सकाळपासून जोर धरला आहे. या पावसाने नुकसानीतून ...

शिराळा पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला
कोकरुड : शिराळा पश्चिम भागात गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या रिमझिम पावसाने शनिवारी सकाळपासून जोर धरला आहे. या पावसाने नुकसानीतून वाचलेल्या खरीप हंगामातील पिकांना संजीवनी मिळणार आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिराळा पश्चिम भागातील वारणा पाणलोट क्षेत्रात आणि उंचावरील भागात मुसळधार पावसाने वारणा नदीला पूर येऊन नदीकाठी असलेल्या शेकडो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे बांध फुटले, माती वाहून गेली, उभी पिके मोडून पडली, पिकांची वाढ खुंटली. शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने थोडी उघडीप दिली होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू होती. त्यातच शनिवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अधून-मधून येणारी पावसाची सर पाणीच पाणी करत आहे. पावसामुळे खरीप हंगामातील अतिवृष्टीतून वाचलेल्या भुईमूग, सोयाबीन, भात यांना पावसामुळे संजीवनी मिळाली आहे. संततधार पावसामुळे डोंगर, दरी, माळ अशा ठिकाणी गवत चाऱ्याची चांगली उगवण झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.