पावसाने सांगलीत दलदल, रस्ते बंद

By Admin | Updated: June 8, 2014 00:43 IST2014-06-08T00:41:24+5:302014-06-08T00:43:24+5:30

वादळी वारे : शेकडो घरांना पाण्याने वेढले, शेरीनाल्यातून फेसाळलेले सांडपाणी कृष्णेच्या पात्रात

Rainfall of Sangliyas, roads closed | पावसाने सांगलीत दलदल, रस्ते बंद

पावसाने सांगलीत दलदल, रस्ते बंद

सांगली : शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार आणि संततधार मान्सूनपूर्व पावसाने शहराची दैना उडाली. केबलसाठी रस्ते खुदाई करण्यात आल्याने रस्ते चिखलमय झाले आहेत. उपनगर व गुंठेवारी परिसरातील नागरिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सर्वत्र दलदल निर्माण झाल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत. दुचाकीवरूनच काय चालत जाण्यासाठीही नागरिकांना कसरत करावी लागत आहे. त्यातच शंभर फुटी रोडवरील मोठ्या गटारी कचऱ्याने तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे.
शहर परिसरात शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला तासभर मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. रात्रभर झालेल्या पावसाने दैना उडाली. सिव्हिल रोड, झुलेलाल चौक, सांगली हायस्कूल रस्ता, कॉलेज कॉर्नर परिसर, हरिपूर रस्ता, कोल्हापूर रस्ता, शंभर फुटी रोड आदी ठिकाणी केबलसाठी रस्त्यांची खुदाई करण्यात आली असून, खड्डे मुजवण्यासाठी मातीचा वापर झाल्याने माती रस्त्यावर पसरून रस्ते चिखलमय झाले आहेत.
संजयनगर, शामरावनगरातील अनेक घरांना पावसाच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने गटारी तुंबल्या आहेत. या ठिकाणच्या विनायकनगर, आप्पासाहेब पाटीलनगरला जाणारा रस्ता बंद झाला आहे. दलदलीमुळे या नगरांना दुचाकीवरूनच काय चालत जाणेही अवघड झाले आहे. शंभर फुटी रस्त्यालगत करण्यात आलेल्या मोठ्या गटारीही कचऱ्यामुळे तुंबल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या वस्त्यांमध्येही दलदल निर्माण झाली आहे. संजयनगरातील बेदमुथा प्लॉटमधील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. रस्तेही चिखलमय झाले आहेत. इंदिरानगरातील सांस्कृतिक भवनालाही पाण्याचा वेढा पडला आहे. येथील गटारीही तुंबल्या आहेत. खणभागमधील ड्रेनेजचे पाणी भरून वहात होते. त्यामुळे दुर्गंधी पसरली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Rainfall of Sangliyas, roads closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.