शिराळ्यातील पर्जन्यमापन यंत्रात अखेर पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST2021-07-27T04:28:17+5:302021-07-27T04:28:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : मुसळधार पावसामुळे सॅटेलाईटच्या रेंजअभावी शिराळा तालुक्यातील पर्जन्यमापन यंत्रावर न मिळालेली २२ ते २४ जुलैदरम्यानच्या ...

Rainfall recorded in Shirala rain gauge | शिराळ्यातील पर्जन्यमापन यंत्रात अखेर पावसाची नोंद

शिराळ्यातील पर्जन्यमापन यंत्रात अखेर पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : मुसळधार पावसामुळे सॅटेलाईटच्या रेंजअभावी शिराळा तालुक्यातील पर्जन्यमापन यंत्रावर न मिळालेली २२ ते २४ जुलैदरम्यानच्या पावसाची नोंद अखेर साेमवारी मिळाली. दि.२३ रोजी तालुक्यात सरासरी ३३८.८० मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सलग तीन दिवस अतिवृष्टी झाली असून २२१.३९ सरासरी पाऊस झाला आहे. मात्र, अद्याप पाथरपुंज येथील पावसाची नोंद मिळालेली नाही.

शिराळा तालुक्यात पावसाने तीन दिवस हाहाकार माजवला. यामुळे वीज वितरण व्यवस्था कोलमडली. परिणामी येथील सॅटेलाईटला रेंज न मिळाल्याने पावसाची नोंद मिळाली नव्हती. त्यामुळे पूर्वीचीच यंत्रणा बरी म्हणायची वेळ आली हाेती. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज या सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणाचीही पाच दिवसांत नोंद झाली नाही.

अगोदर मंडलनिहाय संबंधित अधिकारी अथवा तेथील कर्मचारी पावसाची नोंद घेत होते. आधुनिकीकरणानंतर मंडलनिहाय नोंदीही ऑनलाइनच संबंधित विभागास मिळतात, पण सॅटेलाईटची यंत्रणा ठप्प झाल्याने चरण या पावसाचा आगार समजल्या जाणाऱ्या भागातही चक्क शून्य मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

काही दिवसांपूर्वी शिराळा औद्योगिक वसाहत व तालुक्याच्या उत्तर भागात ढगफुटीसदृश पाऊस व वादळ झाले. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. हा पाऊस आणि वारा डोंगरमाथ्यावरून खाली वेगात आला. कधी पडला नसेल एवढा पाऊस तासात पडला. मात्र, पर्जन्यमान मापक यंत्राने केवळ १२ मिलिमीटर पावसाची नोंद दाखवली होती. पाऊस एकीकडे आणि पर्जन्यमान मापक यंत्र व सॅटेलाईट यंत्रणा एकीकडे यामुळे नोंद कमी झाली होती.

यानंतर २२ ते २४ जुलैदरम्यानच्या पावसाचीही नाेंद मिळाली नव्हती. ती साेमवारी मिळाली. या तीन दिवसांत सरासरी पाऊस ३०५.७० मिलीमीटर झाला आहे. यावर्षी ८३९.८० मिलिमीटर पावसाची नाेंद झाली असून ताे सरासरीच्या २७४.७० टक्के आहे.

दि. २२ रोजीचा मंडलनिहाय पाऊस मिलिमीटर

कोकरुड - १६२.५०

शिराळा - १४७.५०

शिरशी - १५४.८०

मांगले - १३३.००

सागाव- १४५.३०

चरण - १८२.५०

दि.२३ रोजीचा मंडलनिहाय पाऊस

कोकरुड - ३०८.३०

शिराळा - ३५२.७०

शिरशी - ३१५.००

मांगले - ३१३.५०

सागाव- ३३६.८०

चरण - ४०६.३०

दि.२४ रोजीचा मंडलनिहाय पाऊस

कोकरुड - १५०.५०

शिराळा - १६७.८०

शिरशी - २०९.३०

मांगले - १६१.८०

सागाव- १५६.३०

चरण - १८१.३०

Web Title: Rainfall recorded in Shirala rain gauge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.