जिल्ह्यातील पावसाचे गणित ५० टक्के तुटीचे!
By Admin | Updated: October 1, 2015 22:45 IST2015-10-01T22:45:45+5:302015-10-01T22:45:45+5:30
सप्टेंबरअखेर ५७ टक्के पाऊस : तीन तालुक्यांत निम्माच पाऊस--- दुष्काळाची दाहकता

जिल्ह्यातील पावसाचे गणित ५० टक्के तुटीचे!
शीतल पाटील- सांगली---जिल्ह्यात पावसाचे चित्र अद्याप अस्पष्ट असून परतीच्या पावसाने काहीसा दिलासा दिला आहे. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात केवळ ५७.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस गतवर्षीच्या तुलनेत सरासरी ५० टक्के कमी आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यात सरासरी ५० टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई, चाराटंचाईसह दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. जिल्ह्यात जून महिन्यात पावसाची धीम्या गतीने सुरुवात झाली. मिरज, शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव वगळता अन्य तालुक्यात कमी पाऊस झाला. जूनमध्ये शिराळ्यात ३०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. जुलै महिन्यात मात्र पावसाने दडी मारली. जुलै व आॅगस्ट हे दोन महिने कोरडे गेल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद झाले होते. पावसाअभावी सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद, कापूस ही पिके वाया गेली. दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली. जिल्ह्यातील तलाव, विंधन विहिरींनी तळ गाठला होता. सप्टेंबर महिन्यात मात्र बऱ्यापैकी पाऊस बसरला. त्यामुळे काही पिकांना जीवदान मिळाले. एकूणच खरीप हंगामात ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती जिल्ह्यात राहिली.जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या पाच महिन्यात सरासरी ५१० मि.मी. पाऊस होतो. यंदा सप्टेंबरपर्यंत २९१.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी जिल्ह्यात १०४.९ टक्के म्हणजे ५३५.७ मि.मी. पाऊस झाला होता. त्या तुलनेत सप्टेंबरअखेरपर्यंत ५० टक्के पाऊस कमी झाला आहे. आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यात परतीचा पाऊस बऱ्यापैकी होतो. पण यंदा हवामान खात्यानेच सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तविल्याने या महिन्यात किती पाऊस पडतो, त्यावरच जिल्हा प्रशासनाला भविष्यातील नियोजन करावे लागणार आहे.
सरासरीपेक्षा कमी पाऊस---जिल्ह्यातील एकाही तालुक्याने यंदा पावसाची सरासरी ओलांडलेली नाही. सर्वाधिक सरासरी पावसाची नोंद आटपाडी तालुक्यात झाली आहे. या तालुक्याची सरासरी ३५५ मि.मी. असून प्रत्यक्षात २९५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडीची सरासरी टक्केवारी ८३.३ टक्के आहे. त्याखालोखाल खानापूर व शिराळा या दोन तालुक्यात पाऊस झाला आहे. या दोन्ही तालुक्यात सरासरी ६४.२ व ६४ टक्के पाऊस बरसला आहे. वाळवा, तासगाव व कवठेमहांकाळ या तीन तालुक्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही. सर्वात कमी पावसाची नोंद वाळवा तालुक्यात झाली आहे.
गतवर्षी सहा तालुके १०० टक्के
गतवर्षी जिल्ह्यातील मिरज, जत, शिराळा, आटपाडी, कवठेमहांकाळ, कडेगाव या सहा तालुक्यांनी सरासरी ओलांडली होती, तर खानापूर, वाळवा, तासगाव, पलूस या चार तालुक्यात ९० टक्के पाऊस झाला होता. गतवर्षीची तालुकानिहाय आकडेवारी अशी : पलूस १०७.७ मि.मी., जत १०५.३, खानापूर ९८.२, वाळवा ९०, तासगाव ८८.२, शिराळा १२६.६, आटपाडी १०७.५, कवठेमहांकाळ १००.६, पलूस ९१.६, कडेगाव ११९.४.