पलूस तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
By Admin | Updated: May 16, 2016 00:46 IST2016-05-16T00:46:53+5:302016-05-16T00:46:53+5:30
मोठी हानी : घरांचे छत उडाले; विद्युतपुरवठाही खंडित

पलूस तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
पलूस/कुंडल/अंकलखोप : पलूस तालुक्यात रविवारी रात्री जोरदार वाऱ्याने ग्रामस्थांची त्रेधातिरपीट उडविली. जोरदार वारे व विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. वाऱ्याने परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडाले. झाडांच्या फांद्या मोडल्या. विजेचे खांब उन्मळून पडल्याने तारा तुटून वीजपुरवठा बंद पडला.
तीन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण आहे. दिवसभर मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता; मात्र पाऊस पडत नव्हता. रविवारी सायंकाळी पलूससह बांबवडे, सांडगेवाडी, आंधळी, कुंडल, किर्लोस्करवाडी, आमणापूर, धनगाव, दुधोंडी, तुपारी, भोगाव, राडेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याने हजेरी लावली. विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्याने ग्रामस्थांची पळापळ झाली. अनेक घरांवरील पत्रे उडाले. कऱ्हाड-तासगाव रस्त्यावर झाडांच्या फांद्या अनेक ठिकाणी मोडून पडल्या होत्या. जोरदार वारे व विजांच्या कडकडाटामुळे मोठा पाऊस पडणार, अशी अपेक्षा होती. मात्र अपवाद वगळता पावसाने पुन्हा हुलकावणी दिली. वादळी वाऱ्यामुळे परिसरात विजेचे खांब उन्मळून पडल्याने पलूस, भिलवडी, अंकलखोप परिसरातील वीज पुरवठा बंद पडला.
व्यासपीठ उडाले
सूर्यगाव (ता. पलूस) येथे खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत नूतन पोलिस पाटील संदीप पाटील यांच्या सत्कारासाठी व्यासपीठ व मंडप उभारण्यात आला होता. खासदार पाटील कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांचे पुत्र प्रभाकर पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, तालुकाध्यक्ष विजय पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू असतानाच वादळ सुरू झाले. यामुळे कार्यक्रम थांबवून सर्वजण व्यास-पीठावरून खाली उतरले. त्यानंतर काही क्षणातच जोरदार वाऱ्याने संपूर्ण व्यासपीठ व मंडप उखडून उडून गेला.