आटपाडीकरांना पावसाने दिलासा
By Admin | Updated: October 6, 2015 00:35 IST2015-10-05T23:35:24+5:302015-10-06T00:35:06+5:30
रब्बी पेरणीला उपयुक्त : तालुक्यातील शंभर टक्के पेरणी होणार

आटपाडीकरांना पावसाने दिलासा
अविनाश बाड -- आटपाडी --दुष्काळाच्या संकटाने धास्तावलेल्या आटपाडीकरांना दमदार पावसाने दिलासा दिला आहे. रविवारी सायंकाळपर्यंत आटपाडी आणि महाडिकवाडी हे दोन तलाव भरले. तालुक्याच्या पूर्व भागावर पावसाने कृपा केल्याने आटपाडी आणि दिघंचीतील पावसाची सरासरी ओलांडली आहे. डाळिंबाला जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे तालुक्यातील ४४ हजार ३०० हेक्टरवर म्हणजे १०० टक्के पेरणी क्षेत्रात रब्बी हंगामाची पेरणी होणार आहे. यंदा पावसाने तालुक्याच्या पूर्व भागात ‘खुशी’, तर पश्चिम भागात ‘गम’ अशी विचित्र परिस्थिती निर्माण केली आहे.
भीषण दुष्काळी परिस्थितीच्या उंबरठ्यावर असलेल्या तालुक्याला परतीच्या पावसाने चांगली साथ दिली आहे. सप्टेंबर महिन्यात दि. ६ पासून दि. १७ सप्टेंबरपर्यंत तालुक्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेला असला तरी, या पावसाने रब्बी हंगामाच्या पेरणीची आशा बळावली.
दि. १५ सप्टेंबर ते दि. १५ आॅक्टोबर हा रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी उत्तम कालावधी मानला जातो. सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसावर पेरणी केली, तर आगाप होऊन आॅक्टोबर ‘हीट’मध्येही पिके सापडून पाऊस लांबला, तर अनिष्ट परिणाम होण्याची भीती होती. तरीही काही शेतकऱ्यांनी ज्यांची राने पेरणीसाठी तयार होती, त्यांनी पेरणीचे धाडस केले.
दरम्यान, या पावसाने तालुक्यातील डाळिंबाच्या बागांना मोठे जीवदान मिळाले. डाळिंबाच्या बागांसाठी अनेक ठिकाणी सुरू असलेले टॅँकर बंद झाले. पण ओढे, नाले आणि माणगंगा नदी वाहून तलावातील पाणी पातळीत वाढ होण्यासाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत तालुकावासीय होते. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे तालुकावासीय काहीसे धास्तावले होते. पण दि. १ आॅक्टोबरपासून तालुक्यात पुन्हा पावसाने आगमन केले. दि. ४ रोजी तालुक्यात कुठेच पाऊस झाला नाही. मात्र हा अपवाद वगळता ४ दिवस पावसाने कृपा केल्याने पूर्व भागातील पावसाची सरासरी अेलांडली. तालुक्यात सरासरी ३५५ मि.मी. एवढा पाऊस पडतो. आजअखेर तालुक्यात आटपाडीत ३५७ मि.मी., दिघंचीत ४४० मि.मी., तर खरसुंडीत २५५ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
आटपाडी विठलापूरच्या ओढ्याला पाणी आले आहे. माणगंगा नदीला मात्र थोडे पाणी आहे. तालुक्यातील ओढे वाहण्यासाठी पश्चिम भागात चांगला पाऊस होण्याची गरज आहे. मात्र तिकडेच यंदा पर्जन्यमान कमी आहे. तरीही या पावसाने पेरणी होणार असली तरी तालुक्यातील सर्व तलाव भरण्यासाठी आणि भूजल पातळीत वाढ होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे.
छावणी चालकांचा नवस वाया गेला!
महिन्याभरापूर्वी तालुक्यावर भीषण दुष्काळाची छाया होती. त्यामुळे जनावरांसाठी छावण्या काढून मालामाल होण्यासाठी टपलेल्या काही पांढऱ्या बोक्यांनी चक्क तालुक्यात पाऊस पडू नये आणि आपल्याला छावणी मिळावी यासाठी लोटेवाडीच्या एका देवतेला नवस केल्याची चर्चा होती. काही छावणीचालकांनी तहसील कार्यालयात छावणीसाठी अर्जही केले होते, पण देवाने छावणी चालकांचे ऐकल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या पावसाने तालुकावासीयांना खूश केले असले तरी, काही छावणीचालक मात्र नाराज झाले आहेत.