दुष्काळी भागासह जिल्ह्यात पाऊस

By Admin | Updated: June 8, 2014 00:43 IST2014-06-08T00:36:31+5:302014-06-08T00:43:49+5:30

वीजपुरवठा खंडित : मिरज तालुक्यातील ओढ्यांना पूर

Rain in the district with drought area | दुष्काळी भागासह जिल्ह्यात पाऊस

दुष्काळी भागासह जिल्ह्यात पाऊस

सांगली : दुष्काळी जत, खानापूर, आटपाडी भागासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. झाडे उन्मळून पडण्याबरोबर काही ठिकाणी घराच्या छतांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने विजेच्या तारा तुटून वीजपुरवठाही खंडित झाला होता.
शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटेपर्यंत जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. विटा शहरासह खानापूर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी वादळी वाऱ्यात तालुक्यातील खानापूर व बामणी परिसरात घरांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. जत शहर व परिसरात शुक्रवारी रात्री विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला. हा पाऊस खरीप हंगामाच्यापेरणीसाठी उपयुक्त असल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. पावसामुळे उन्हाळी भुईमूग, कापूस, मका, ऊस, आदी पिकांना पोषक वातावरण तयार झाले आहे. शिराळा तालुक्यात उत्तर भाग वगळता शुक्रवारी मध्यरात्री दमदार पावसाने हजेरी लावली, तर उत्तर भागात तुरळक पाऊस पडला. रात्री अडीचनंतर हा पाऊस चालू झाला. रात्रभर वीजपुरवठा खंडित होता. वाळवा तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला. पश्चिम भागात वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.
मिरज शहरासह परिसरास आज, शनिवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. त्यामुळे विद्युतपुरवठा खंडित झाला. मालगाव, बेडग, बोलवाड रस्त्यावरील ओढ्याला पूर येऊन पाणी पुलावरून वाहत होते. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. कवठेमहांकाळ तालुक्यातही सर्वत्र पावसाने हजेरी लावली होती. सांगली शहरातील गावठाणासह गुंठेवारीत आज, शनिवारी पहाटे झालेल्या पावसाने दलदल निर्माण झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Rain in the district with drought area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.