सदानंद औंधेमिरज : मिरजेत आज, मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. काही ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहनांचे व विद्युततारांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शहरातील विद्युत पुरवठा ठप्प झाला होता.सांगली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. उन्हाने लाहीलाही झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. आज, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. मिरजेतील समतानगर, वंटमुरे कॉर्नर, शिवाजीनगर, पटवर्धन हॉल न्यू इंग्लिश स्कूल परिसरात परिसरात वादळी वाऱ्याने झाडे कोसळली. मिरज पंचायत समिती आवारात झाड पडल्याने कुंपणाचे नुकसान झाले. विद्युत तारा तुटल्याने विद्युत पुरवठा बंद झाला. पंचायत समिती व पटवर्धन हॉल परिसरात झाडे पडल्याने चार चाकी वाहनांचे नुकसान झाले.
पावसाने रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. विद्युत तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शहरातील विद्युत पुरवठा ठप्प होता.