रेल्वे इंजिन बंद पडले; मिरजेत वाहतूक ठप्प
By Admin | Updated: September 11, 2015 23:43 IST2015-09-11T23:07:15+5:302015-09-11T23:43:48+5:30
विजयनगरची घटना : तीन तास खोळंबा

रेल्वे इंजिन बंद पडले; मिरजेत वाहतूक ठप्प
मिरज : बेळगाव रेल्वे मार्गावर विजयनगर येथे शुक्रवारी सकाळी मालगाडीचे इंजिन नादुरुस्त झाल्याने तब्बल तीन तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. बेळगावकडे जाणाऱ्या, येणाऱ्या एक्स्प्रेस व पॅसेंजर रेल्वे गाड्या मिरज स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. विलंबामुळे प्रवासी व रेल्वे अधिकारी यांच्यात वादावादी झाली.मिरजेतून बेळगावजवळील देसूर येथे इंधन घेऊन जाणाऱ्या ५० टॅँकरच्या मालगाडीच्या दोन इंजिनांपैकी एक इंजिन विजयनगर स्थानकाच्या आऊटर सिंग्नलजवळ बंद पडले. एका इंजिनने मालगाडी खेचता न आल्याने मालगाडी रूळावरच थांबून राहिली. यामुळे मिरजेतून बेळगावकडे जाणारी जोधपूर-बेंगलोर एक्स्प्रेस मिरज स्थानकात थांबविण्यात आली. तब्बल तीन तास रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते. जोधपूर एक्स्प्रेस व बेळगाव पॅसेंजरमधील प्रवाशांनी विलंबाबद्दल मिरजेत रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारल्याने त्यांच्यात वादावादी झाली. मिरजेतच रेल्वेगाड्या थांबविल्याने येणाऱ्या इतर मार्गावरील रेल्वेगाड्या अन्य रेल्वे रुळावर वळविताना रेल्वे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. एका नादुरुस्त इंजिनमुळे कर्नाटकात जाणाऱ्या-येणाऱ्या रेल्वेगाड्यांचा बोजवारा उडाला होता. (वार्ताहर)
बेळगावहून इंजिन --मालगाडी हलविल्यानंतर जोधपूर एक्स्प्रेस मिरजेतून पाठविण्यात आली. मात्र बेळगाव पॅसेंजरचे इंजिन विजयनगरला पाठविण्यात आल्याने बेळगाव पॅसेंजर साडेतीन तास मिरजेतच थांबली होती.