जत तालुक्यात दारू अड्ड्यांवर छापे
By Admin | Updated: April 15, 2015 00:27 IST2015-04-15T00:27:08+5:302015-04-15T00:27:08+5:30
तिघांना अटक : शेगाव, डफळापूर, सिंदूर, अंकले येथे भरारी पथकाची कारवाई

जत तालुक्यात दारू अड्ड्यांवर छापे
सांगली : जत तालुक्यातील सिंदूर, शेगाव, डफळापूर, अंकले येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यावर छापे टाकले. या छाप्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून हातभट्टीची तयार दारू, कच्चे रसायन, तसेच देशी दारूचा साठा असा एकूण ४७ हजारांचा माल जप्त केला आहे. निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती अधीक्षक प्रकाश गोसावी यांना मिळाली होती. त्यांनी भरारी पथकास कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार निरीक्षक रावसाहेब कोरे, दुय्यम निरीक्षक इंद्रजित कोलप, रामभाऊ पुजारी, रणधीर पाटील, इरफान शेख, करण सर्वदे, अर्जुन कोरवी, सुवास पोळ, संतोष बिराजदार, सचिन जाधव, संजय गोडसे, अमित पाटील, वैभव पवार यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे एकाचवेळी सिंदूर, शेगाव, डफळापूर, अंकले या चार गावांतील दारू अड्ड्यांवर छापे टाकले. छाप्याची चाहूल लागल्याने अनेकांनी पलायन केले. पण शिवानंद बसाप्पा हिप्परगी (वय २२), इराप्पा पवाडी हिप्परगी (२३, सिंदूर) व सचिन विलास निकम (२९, शेगाव) हे तिघे सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली.
गेल्या आठ दिवसांपासून पथकातील कर्मचारी जत तालुक्यात कुठे हातभट्टीचे अड्डे सुरू आहेत, याची माहिती घेत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना या चार गावात अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही कारवाई केली. (प्रतिनिधी)