सांगलीच्या राधिका आवटीला राष्ट्रीय तलवारबाजीत सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST2021-03-24T04:24:20+5:302021-03-24T04:24:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगलीच्या राधिका आवटी हिने नुकतेच रुद्रपूर (उत्तराखंड) येथे झालेल्या ३१ व्या वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी ...

सांगलीच्या राधिका आवटीला राष्ट्रीय तलवारबाजीत सुवर्णपदक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगलीच्या राधिका आवटी हिने नुकतेच रुद्रपूर (उत्तराखंड) येथे झालेल्या ३१ व्या वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत फॉइल प्रकारात सुवर्णपदक पटकावून कतार (दोहा) येथील फॉइल ग्रँड प्रीक्स स्पर्धेसाठी तसेच ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी तिची निवड झाली आहे.
अकिवाट (ता. शिरोळ) हे राधिकाचे मूळ गाव आहे. तिचे प्राथमिक शिक्षण कुपवाडमधील नवकृष्णा व्हॅली येथे झाले आहे. सध्या ती केरळ येथे ‘साई’ प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहे. सरावातील सातत्य, मेहनतीच्या जोरावर तिने तलवारबाजी स्पर्धेत मोठी मजल मारली. गतवर्षी वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले होते. तिची ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी निवड झाली होती.
कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षी ऑलिम्पिक पात्रता फेरी होऊ शकली नाही. यंदा ३१ वी वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा रुद्रपूरला झाली. केरळ संघाकडून खेळताना राधिकाने फॉइल प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले, तर सांघिक प्रकारात संघाला रौप्य पदक मिळवून दिले. या स्पर्धेतील कामगिरीमुळे कतार (दोहा) येथे २६ ते २८ मार्चअखेर होणाऱ्या फॉइल प्रकारातील ग्रँड प्रीक्स स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तसेच यंदाही ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी तिची निवड झाली आहे. मूळचे हरिपूर (ता. मिरज) येथील आणि सध्या केरळमधील साई केंद्रात कार्यरत एनआयएस प्रशिक्षक सागर लागू यांच्या मार्गदर्शनाखाली राधिका सराव करीत आहे. फॉइल प्रकारात सध्या ती देशातील आघाडीची खेळाडू आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांतून तिने अनेक पदकांची लयलूट केली आहे. एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक २०२४ साठी तिचा सराव सुरू आहे.