शर्यत बंदी विरोधातील मोर्चा अडवला
By Admin | Updated: April 16, 2015 00:05 IST2015-04-15T23:24:04+5:302015-04-16T00:05:47+5:30
घटनास्थळी निवेदन स्वीकारले : जिल्ह्यातील शर्यत शौकिनांचा सहभाग

शर्यत बंदी विरोधातील मोर्चा अडवला
सांगली : बैलगाडी शर्यतीवरील बंदीमुळे जातीवंत बैलांच्या प्रजाती नष्ट होत असून, ग्रामीण भागातील उत्सवामधील शेतकऱ्यांचा मनोरंजनाचा खेळ नष्ट होत आहे. यासाठी शर्यतीवर असलेली बंदी उठवण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी सांगलीत बैलगाडीसह मोर्चा काढण्यात आला. मोर्चा सुरुवातीलाच पोलिसांनी अडवून त्याला परवानगी नाकारली. मोर्चामुळे होणारी वाहतुकीची कोंडी व विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ही परवानगी नाकारल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, विश्रामबाग चौकातच जिल्हा प्रशासनाकडून निवेदन स्वीकारण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व शिराळा ग्रामपंचायतीचे सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांनी केले.
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवून शर्यतीसाठी परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी विश्रामबाग चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. यासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्याबरोबर कर्नाटक, महाराष्ट्र सीमेवरील शर्यतशौकीन, बैलगाडीचालक, मालक आदी मोठ्यासंख्येने आले होते. सुमारे चारशेहून अधिक बैलगाडीचालक बैलगाडीसह मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच पोलिसांनी सकाळी अकरा वाजता विश्रामबाग चौकातच मोर्चा अडवला. पोलीस उपाधीक्षक प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक धनंजय भांगे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू मोरे आदींनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. विश्रामबाग चौक ते पुष्कराज चौक रस्त्याची दुरुस्ती सुरु असून, एकेरी वाहतूक सुरू आहे. त्याचबरोबर विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिताही सुरू आहे.
शहरामध्ये मोर्चामुळे वाहतुकीची कोंडी होणार असून, मोर्चा स्थगित करण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली. काही वेळ झालेल्या वादावादीनंतर विश्रामबाग चौकातच जिल्हा प्रशासनाने निवेदन स्वीकारावे, असे ठरले. त्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने तहसीलदार किशोर घाटगे यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बैलगाडी शर्यत बंदीमुळे जातीवंत बैलांच्या प्रजाती नष्ट होण्याची भीती आहे. ग्रामीण भागातील उत्सव, उरूस, यात्रामधील मनोरंजनाचा खेळ बंद होत आहे. अनाधिकालापासून चालत आलेल्या चाली, रूढी बंद होत आहेत. यासाठी शर्यत संहिता बनवून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यात यावी.
आंदोलनामध्ये धनाजी पाटील, विजय शिंदे, जयपाल कोळी, पप्पू संकपाळ, दिलीप बंडगर, भारत गायकवाड, शहाजी दुधाळ, चारुदत्त चौगुले, बाळासाहेब डुबल आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
सांगलीत तीन तास वाहतुकीची कोंडी
मोर्चासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शर्यतशौकीन बैलगाडीसह आले होते. बैलगाड्यांची रांग विश्रामबाग चौक ते लक्ष्मी मंदिर चौकापर्यंत लागली होती. यामुळे या रस्त्यावर सुमारे तीन तास वाहतुकीची कोंडी होती. सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत बैलगाड्या थांबून होत्या. मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर दुपारी बैलगाडीचालक परतले.