आर. आर. आबांच्या पुत्राची ऑक्सिजनसाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:20 IST2021-05-03T04:20:16+5:302021-05-03T04:20:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी देशभर धडपड सुरू असताना तासगाव तालुक्यातील रुग्णांसाठी आर. आर. ...

R. R. Father's son struggles for oxygen | आर. आर. आबांच्या पुत्राची ऑक्सिजनसाठी धडपड

आर. आर. आबांच्या पुत्राची ऑक्सिजनसाठी धडपड

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी देशभर धडपड सुरू असताना तासगाव तालुक्यातील रुग्णांसाठी आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी झोपेतून उठत मध्यरात्री ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला. त्यांच्या या कृतीने अनेकांच्या मनात आबांच्या स्मृती जाग्या केल्या.

तासगाव तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने गरजूंना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध करून देताना प्रशासनाची दमछाक होत आहे. त्याची कल्पना असल्याने रोहित पाटील यांनी शासनाकडे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून तासगावमधील ऑक्सिजनचा पुरवठा काठावर आला होता. त्यामुळे रोहित पाटील यांनी सतत नेत्यांशी संपर्क ठेवला होता.

शनिवारी रात्री साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पाटील यांना फोन केला. ऑक्सिजन टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरून घे, अशी सूचना त्यांनी दिली. रोहित पाटील यांनी मध्यरात्री सांगली गाठली. ऑक्सिजनच्या २३ जम्बो टाक्या व २ ड्युरा टाक्या ताब्यात घेऊन रोहित पाटील स्वतः ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा उपस्थित झाले. ऑक्सिजनभावी कोरोना रुग्ण दगावू नयेत, याची काळजी घेत मध्यरात्री रुग्ण वाचवण्यासाठी आबांच्या मुलाने केलेली ही धडपड कौतुकाचा विषय ठरली आहे.

सांगलीतून ऑक्सिजन सिलिंडर आणून ते ग्रामीण रुग्णालयात जोडून होईपर्यंत रोहित पाटील त्याठिकाणी थांबून राहिले. तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिक कोरोनाकाळात अडचणीत असताना रोहित पाटील यांची तत्परता पाहून सांगलीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही अवाक् झाले.

Web Title: R. R. Father's son struggles for oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.