आर. के. पाटील यांनी बहुजनांपर्यंत शिक्षण पोहोचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST2021-08-25T04:31:03+5:302021-08-25T04:31:03+5:30

डॉ. पाटील यांनी संख येथे शिक्षणाची सोय नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी जत येथील के. एम. हायस्कूल येथे इयत्ता आठवी ते ...

R. K. Patil imparted education to the masses | आर. के. पाटील यांनी बहुजनांपर्यंत शिक्षण पोहोचविले

आर. के. पाटील यांनी बहुजनांपर्यंत शिक्षण पोहोचविले

डॉ. पाटील यांनी संख येथे शिक्षणाची सोय नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी जत येथील के. एम. हायस्कूल येथे इयत्ता आठवी ते इयत्ता अकरावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर पदवीचे शिक्षण विजयपूर येथील एस. बी. आर्ट्स कॉलेज येथे घेतले. बी. एड. पदविका गव्हर्न्मेंट कॉलेज, जमखंडी, कर्नाटक येथे घेतले. पदविकेनंतर १९७१ मध्ये त्यांनी श्री गुरुबसव विद्यामंदिर, संख येथे साहाय्यक शिक्षक म्हणून आपल्या मूळ गावात शिक्षणसेवेस प्रारंभ केला. जून १९७५ मध्ये त्यांची या शाळेत मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाली. त्यावेळी ५४ विद्यार्थी व पाच शिक्षक अशी लहानशी शाळा होती. मुख्याध्यापक पद स्वीकारल्यानंतर शाळेचा विकास करणे हा एकमेव हेतू डोळ्यांसमोर ठेवून सरांनी कार्य केले. सर्वांत प्रथम संख व संख परिसरातील ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, गरीब शेतमजूर, दलित व गरजू मुलांसाठी १९७८ मध्ये श्री गुरुबसव मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाची सुरुवात केली. इयत्ता आठवी ते दहावीचे मराठी माध्यम वर्ग सुरू केले. कन्नडबरोबर प्रथम मराठी माध्यम माध्यमिक शिक्षणाची सोय सरांनी केली. पुढील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाची गरज ओळखून १९८७ मध्ये इयत्ता अकरावी आर्ट्स कन्नड माध्यम शाखेची सुरुवात केली. जतनंतर पूर्व भागात कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात केली. कालांतराने विज्ञान शाखेचे महत्त्व लक्षात घेऊन १९९७ पासून इयत्ता अकरावी विज्ञान शाखेची कन्नड व इंग्रजी माध्यमात सुरुवात केली. कन्नड माध्यमातून विज्ञान शाखेतून शिक्षण देणारे महाराष्ट्रातील एकमेव शाळा आहे. पदवी शिक्षणाची सोय व्हावी यासाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संलग्नित आर. के. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची सुरुवात केली. २०२० पासून शिवाजी विद्यापीठांतर्गत दूरस्थ शिक्षण एम. ए. व एम. कॉम. अभ्यासक्रमाची सुरुवात केली. २०१९ पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकअंतर्गत पदव्युत्तर शिक्षणाची सोय केली. आज संख परिसरातील असंख्य मुले या अभ्यासकेंद्रातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. जत तालुक्यातील एकमेव शैक्षणिक संकुल जे के.जी. ते पी.जी. शिक्षणाची सोय करणारे ठरले आहे. आज या शैक्षणिक संकुलाचे श्री गुरुबसव बाल विद्यामंदिर, श्री गुरुबसव विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, आर. के. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठअंतर्गत दूरस्थ शिक्षण केंद्र, आर. के. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयअंतर्गत वायसीएमओयू अभ्यासकेंद्र, श्री गुरुबसव मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, श्री लायव्वादेवी मुलींचे वसतिगृह, इत्यादी शैक्षणिक सोयी आहेत. सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, बंदिस्त प्रेक्षागृह (इनडोअर गेम), अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम निर्माण केले. जून १९७५ ते नोव्हेंबर २००५ पर्यंत मुख्याध्यापकपदी कार्यरत असताना सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्था, सांगलीचे अध्यक्षपद भूषविले. २००३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळ, कोल्हापूरचे सदस्य म्हणून काम पाहिले. निती आयोग, नवी दिल्ली मान्यताप्राप्त व संयुक्त राष्ट्रसंघ, जिनेव्हा नोंदणीकृत भारत व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशन, बंगलोरच्या वतीने आर. के. पाटील यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. राजस्थानचे राज्यपाल कमलराज मिश्रा यांच्या हस्ते ही पदवी बहाल करण्यात आली. अशा असामान्य कर्तव्यदक्ष आर. के. पाटील सरांची सर्व स्वप्ने, इच्छा, महत्त्वाकांक्षा सफल करण्यासाठी आणि शिक्षण व समाजाची सेवा घडावी यासाठी त्यांना आरोग्यसंपन्नता व दीर्घायुष्य लाभावे, हीच प्रार्थना.

संकलन : मुबारक सौदागर व गुरुबसू वाघोली.

Web Title: R. K. Patil imparted education to the masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.