‘विसापूर’च्या त्या सोळा गावांत ‘खानापूर’चा पैरा?
By Admin | Updated: October 7, 2015 00:01 IST2015-10-06T22:31:18+5:302015-10-07T00:01:32+5:30
राजकीय हालचाली : आजी-माजी आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष ग्रामपंचायतीचा रणसंग्राम

‘विसापूर’च्या त्या सोळा गावांत ‘खानापूर’चा पैरा?
दत्ता पाटील -- तासगाव
तासगाव तालुक्यातील मांजर्डे आणि विसापूर सर्कलमधील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघात समावेश आहे. त्यापैकी १६ ग्रामपंचायतींत निवडणुकीचे धुमशान होत आहे. खानापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची स्वबळ अजमावण्यासाठी चाचपणी सुरू आहे. मात्र तालुक्यातील आबा-काका गटाच्या संघर्षामुळे या नेत्यांच्या स्वबळाची आशा धूसर आहे. त्यामुळे या सोळा गावांसाठी पैऱ्याचे राजकारण होण्याची दाट शक्यता आहे.
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघासाठी विसापूर सर्कलमधील २१ गावांची व्होट बँक निर्णायक ठरणारी आहे. ही व्होट बँक आकर्षित करण्यासाठी आतापर्यंत खानापूरमधून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी सातत्याने संपर्क ठेवला आहे. असे असले तरी, या नेत्यांचा आतापर्यंत स्वत:चा गट या गावांत निर्माण झालेला नाही. १६ गावांत आबा आणि काका गटाचाच पगडा आहे. यावेळीही या दोन गटातच अटीतटीची निवडणूक होणार आहे. गेल्या सहा महिन्यात विसापूर जिल्हा परिषद गट राजकीय भूकंपाचा केंद्रबिंंदू राहिलेला आहे.
खानापूरच्या नेत्यांनी स्वबळासाठी या गावांत चाचपणी सुरू केली आहे. आर. आर. पाटील यांची पोकळी भरून काढण्यासाठी काही नेत्यांकडून आश्वासन दिले जात आहे. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे याहीवेळी आ. अनिल बाबर आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना तासगाव तालुक्यातील नेत्यांशी पैरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आबा, काका गटात कांटे की टक्कर
मांजर्डे-विसापूर सर्कलमधील निवडणूक होत असलेल्या १६ गावांपैकी ९ गावांवर आबा गटाचे प्राबल्य आहे, तर ७ गावांवर काका गटाचे प्राबल्य आहे. विसापूर सर्कलमधील आबा गटाच्या काही शिलेदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर काहींनी राष्ट्रवादीत राहूनच खासदारांशी समझोता केला आहे. तसेच काँग्रेसचे जिल्हा बँकेचे संचालक प्रताप पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे यावेळी विसापूर सर्कलमधील ग्रामपंचायतीत कांटे की टक्कर होणार, हे स्पष्ट आहे.
विसापूर सर्कलमधील ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढवायच्या की पाठिंबा द्यायचा, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. अर्ज दाखल करण्यासाठी अजून अवधी आहे. काही दिवसांत आमची भूमिका स्पष्ट करणार आहे.
आमदार अनिल बाबर, शिवसेना.
तासगाव तालुक्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. त्याबाबत अद्याप काही सांगता येणार नाही.
- सदाशिवराव पाटील, काँग्रेस.