पशुचिकित्सकांचे प्रश्न शासनदरबारी मांडू
By Admin | Updated: November 30, 2015 01:16 IST2015-11-29T23:55:13+5:302015-11-30T01:16:58+5:30
शिवाजीराव नाईक : सांगलीत विभागीय मेळाव्यात प्रतिपादन

पशुचिकित्सकांचे प्रश्न शासनदरबारी मांडू
सांगली : शेती व्यवसाय अडचणीत असताना शेतकऱ्यांसाठी आधार देणाऱ्या पशुचिकित्सकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार शिवाजीराव नाईक यांनी रविवारी सांगलीत दिली.
पशुचिकित्सक व्यवसायी संघटनेचा पुणे विभागीय मेळावा व राज्य कार्यकारिणी सभा असा संयुक्त कार्यक्रम सांगलीत झाला. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती मनीषा पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष सुनील काटकर, सरचिटणीस मारुती कानोळे, कार्याध्यक्ष ज्ञानेश गांगर्डे, कोषाध्यक्ष श्रीनिवास देशमुख, व्ही. ए. खंदारे, पी. वाय. साळुंखे, बी. एन. राजमाने, अशोक आटगुडे उपस्थित होते.
आ. नाईक म्हणाले,पशुसंवर्धन विभागात सर्वात महत्त्वाचा व प्रत्यक्ष जनावरांच्या गोठ्यापर्यंत जाऊन सेवा देण्याचे काम हा घटक करतो. मात्र त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र आपण स्वत: याप्रकरणी लक्ष घालू. पशुचिकित्सकांचे प्रश्न शासन दरबारी मांडू.
जि. प. च्या कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मनीषा पाटील यांनीही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या घटकाचे प्रश्न शासन दरबारी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजीर चौगुले यांनी स्वागत केले. राज्य संघटनेचे अध्यक्ष काटकर यांनी पशुचिकित्सकांच्या प्रश्नांची माहिती दिली. शासन व जिल्हा परिषद सेवेतील पदविका, प्रमाणपत्रधारक यांना पुनश्च व्यावसायिक नोंदणी प्राप्त व्हावी, तोपर्यंत राज्य शासनाच्या अधिकारात बिगर पदवीधारकांना स्वतंत्र व्यवसायाची परवानगी मिळावी, पशुधन विकास अधिकारी व पशुधन विकास अधिकारी गट ब या पदोन्नत्या कराव्यात, ग्रामसेवक, कृषीसहायक यांच्या धर्तीवर पशुचिकित्सक कर्मचाऱ्यांनाही दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता देण्यात यावा, यासह विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. (प्रतिनिधी)
संघटनेच्या मागण्या
पशुधन विकास अधिकारी व गट ब या पदोन्नत्या कराव्यात, ग्रामसेवक, कृषीसहायक यांच्या धर्तीवर पशुचिकित्सक कर्मचाऱ्यांनाही दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता देण्यात यावा, या मागण्या करण्यात आल्या.