विनायकअण्णांच्या राजकीय अस्तित्वावर आता प्रश्नचिन्ह
By Admin | Updated: March 19, 2015 23:55 IST2015-03-19T22:52:25+5:302015-03-19T23:55:57+5:30
परदेश दौऱ्यावर अतिरिक्त खर्च केल्याच्या कारणावरून

विनायकअण्णांच्या राजकीय अस्तित्वावर आता प्रश्नचिन्ह
अशोक पाटील -इस्लामपूर ---परदेश दौऱ्यावर अतिरिक्त खर्च केल्याच्या कारणावरून ‘महानंद’चे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विनायकराव (अण्णा) पाटील यांचे सदस्यत्व रद्द करतानाच, पुढील सहा वर्षे ‘महानंद’ची निवडणूक लढविण्यासाठी त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. या निर्णयाचा विपर्यास करून काहींनी त्यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.विनायकराव पाटील हे वाळवा तालुक्यातील ज्येष्ठ नेते असून माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचे नजीकचे सहकारी आणि कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत. दूध व्यवसायाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. राजारामबापू दूध संघावर त्यांनी अनेक वर्षे अध्यक्ष, संचालक म्हणून काम केले आहे. या अनुभवाच्या जोरावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांनी त्यांना राज्यपातळीवरील ‘महानंद’सारख्या दूध संघांच्या शिखर संस्थेवर काम करण्याची संधी दिली. त्यांच्यासोबत इस्लामपूरचे नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनाही संचालकपदाची संधी दिली होती. ‘महानंद’च्या परदेश दौऱ्यावर अतिरिक्त खर्च केल्याच्या कारणावरून विनायकराव पाटील यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून, पुढील सहा वर्षे ‘महानंद’ची निवडणूक लढविण्यासाठी त्यांना अपात्र ठरविले आहे. वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. भाजप, शिवसेना आणि इतर पक्षांची ताकद तोकडी आहे. त्यामुळे जयंतरावांची ताकद कमी करण्यासाठी भाजपने विनायकरावांना लक्ष्य केल्याची चर्चा विनायकरावांच्या समर्थकांतून होत आहे. राजारामबापू दूध संघावरही त्यांना संधी मिळणार नसल्याची चर्चा त्यांचे विरोधक असलेले राष्ट्रवादीतील काही कार्यकर्ते दबक्या आवाजात करताना दिसत आहेत. यातून काहींनी त्यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
विनायकराव पाटील ‘महानंद’सह राजारामबापू दूध संघाच्या संचालकपदी काम करत असल्याने तेथे त्यांचा दबदबा होता. राजारामबापू दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष नेताजीराव पाटील त्यांचे समर्थक असले तरी, त्यांच्यात मतभेद असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत दोघेही दुजोरा देत नाहीत. याउलट जयंत पाटील जी जबाबदारी देतील ती स्वीकारू, असेही सांगत आहेत. त्यामुळे विद्यमान व माजी संचालकांत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळेच दूध संघाची आगामी निवडणूक जयंत पाटील कशी हाताळणार, याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.