इस्लामपुरात भाजी मंडई स्थलांतराचा प्रश्न चिघळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:18 IST2021-02-20T05:18:01+5:302021-02-20T05:18:01+5:30

इस्लामपूर : येथील गणेश मंदिराजवळची भाजी मंडई हटविण्याच्या प्रश्नावरून राजकारण पेटले आहे. ती स्थलांतरित करू नये, यासाठी विक्रेत्यांनी विरोध ...

The question of migration of vegetable market in Islampur will simmer | इस्लामपुरात भाजी मंडई स्थलांतराचा प्रश्न चिघळणार

इस्लामपुरात भाजी मंडई स्थलांतराचा प्रश्न चिघळणार

इस्लामपूर : येथील गणेश मंदिराजवळची भाजी मंडई हटविण्याच्या प्रश्नावरून राजकारण पेटले आहे. ती स्थलांतरित करू नये, यासाठी विक्रेत्यांनी विरोध केला आहे. या प्रश्नावर लोकप्रतिनिधींमध्ये मतभेद असल्याने हा प्रश्न चिघळणार आहे. काही शिवप्रेमींनी मंडई स्थलांतरित करण्यासाठी शिवजयंतीस उपोषण केले.

इस्लामपूर पालिकेने महादेवनगर परिसर आणि डांगे चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने भाजी मंडईची उभारणी केली आहे. महादेवनगर येथील मंडईची दुरवस्था झाली आहे. याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने पडझड झाली आहे. मंडई सुरू करावी म्हणून येथील नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे गणेश मंदिरानजीक सकाळच्या सत्रात भरणारी मंडई डांगे चौकात हलविण्यासाठी पालिका प्रशासनासह राष्ट्रवादीतील काही पदाधिकारी आग्रही आहेत. विकास आघाडीतील काही पदाधिकाऱ्यांनी ही मंडई गणेश मंदिरानजीकच भरवावी, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे हा प्रश्न पालिका सभागृहापुढे मांडण्यात येणार आहे.

हा वाद सुरू असतानाच शिवप्रेमी गजानन पाटील, बाळासाहेब गायकवाड, शेखर खांडेकर, दीपक चौधरी, अरविंद पाटील, अक्षय कांबळे, तुषार भुतकर, व्यंकटेश सूर्यवंशी, भाऊसाहेब माने, संग्राम पाटील, उदयकुमार वंजारी यांनी मंडईचे स्थलांतर व रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी शिवजयंतीस उपोषण केले. मंडई स्थलांतरित करण्यासाठी विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांनी पालिकेतच मंडईत भरवून अनोखे आंदोलन केले होते. त्यानंतर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी २२ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. पालिका सभागृहात हा मुद्दा येणार असून, यावर तोडगा काय निघणार, याकडे भाजीपाला विक्रेते आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

चौकट

आश्वासनानंतर उपोषण मागे

शहरातील रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांना लवकरच छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. अतिक्रमणविरोधी कारवाईही लवकरच सुरू करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आल्याचे गजानन पाटील यांनी सांगितले.

Web Title: The question of migration of vegetable market in Islampur will simmer