माजी सैनिकांचे प्रश्न एकजुटीनेच सुटतील
By Admin | Updated: August 24, 2014 23:13 IST2014-08-24T23:08:46+5:302014-08-24T23:13:23+5:30
भगतसिंग देशमुख : आरवडे येथे मेळावा

माजी सैनिकांचे प्रश्न एकजुटीनेच सुटतील
मांजर्डे : माजी सैनिकांची एकजूटच माजी सैनिकांच्या सर्व समस्या सोडवेल. विखुरलेल्या माजी सैनिकांनी एकत्र येऊन संघर्ष केल्याशिवाय त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. यासाठी माजी सैनिकांनी एकत्र येण्याचे आवाहन कर्नल भगतसिंग देशमुख यांनी केले. तासगाव-पलूस तालुका माजी सैनिक संघटनेच्या आरवडे (ता. तासगाव) येथील मेळाव्यात बोलत होते.
ते म्हणाले, जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी मतभेद बाजूला ठेवून सैनिकांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या जिल्ह्यामध्ये १ लाखापेक्षा जास्त माजी सैनिकांची संख्या आहे. जिल्हा सैनिक कार्यालयातून माजी सैनिक, विधवा पत्नी यांना मिळणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा. जिल्हा सैनिक कार्यालयातून
विविध आर्थिक मदत, माजी सैनिकांच्या पाल्यासाठी स्कॉलरशीप, शैक्षणिक मदत, परदेशी शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. या सर्व योजनांचा त्यांनी लाभ घेतला
पाहिजे.
यावेळी तासगाव तालुका माजी सैनिक संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी विनायक चव्हाण यांची फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी रामचंद्र नलवडे यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष अनिल एस. साळुंखे यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी कॅप्टन लक्ष्मण चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रल्हाद भोसले, दत्तात्रय पाटील, शंकर भोसले उपस्थित होते. (वार्ताहर)