सांगलीत पत्ते खेळणाऱ्यांकडून चाकूच्या धाकाने सव्वा लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:29 IST2021-08-28T04:29:54+5:302021-08-28T04:29:54+5:30
सांगली : शहरातील वाल्मिकी आवासमध्ये पत्ते खेळत बसलेल्यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याची चेन, रोख रक्कम असा एक लाख ...

सांगलीत पत्ते खेळणाऱ्यांकडून चाकूच्या धाकाने सव्वा लाख लंपास
सांगली : शहरातील वाल्मिकी आवासमध्ये पत्ते खेळत बसलेल्यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याची चेन, रोख रक्कम असा एक लाख ११ हजार २२० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी प्रकाश सुखदेव माने (रा. कुपवाड रोड, मिरज) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करण पाटील, विकी गोसावी, करण गायकवाड, गोंड्या उर्फ आकाश जाधव व अमोल साठे (सर्व रा. वाल्मिकी आवास, सांगली) यांच्यावर शहर पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील जुन्या बुधगाव रोडवर असलेल्या वाल्मिकी आवास परिसरात बुधवार, दि. २५ रोजी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी माने व त्यांचे मित्र पत्ते खेळत बसले होते. यावेळी संशयित सर्वजण तिथे आले. त्यांनी पत्त्याचा डाव उधळून लावला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून माने यांची सोन्याची चेन व त्यांच्या मित्राकडे असलेली रोख रक्कम असा १ लाख ११ हजार २२० रुपयांचा ऐवज लंपास केला. यावेळी माने यांनी संशयितांना विरोध करताच त्यांनी लाकडी दांडक्याने मारुन माने यांना गंभीर जखमी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. शहरात भरदुपारी हा प्रकार घडल्याने या परिसरात तणावाचे वातावरण होते. घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. माने यांच्या फिर्यादीनुसार पाचजणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.