डीपीडीसी निधीतून सव्वा कोटीची कामे बदलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:52+5:302021-06-03T04:19:52+5:30
सांगली : जिल्हा नियोजन समितीतून मंजूर सात कोटी रुपयांच्या निधीतील सव्वा कोटीची कामे बदलण्यात आली. महापालिकेत सत्तांतर होताच राष्ट्रवादीने ...

डीपीडीसी निधीतून सव्वा कोटीची कामे बदलली
सांगली : जिल्हा नियोजन समितीतून मंजूर सात कोटी रुपयांच्या निधीतील सव्वा कोटीची कामे बदलण्यात आली. महापालिकेत सत्तांतर होताच राष्ट्रवादीने मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांना दणका दिला. शिवाय, भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांच्या प्रभागातील कामेही वगळली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस-भाजप असा संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या उपमहापौरांवर मात्र महापौरांनी मेहेरनजर दाखवित त्यांना वाढीव निधी दिला.
भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेला सात कोटींचा निधी मंजूर झाला. तत्कालीन महापौर गीता सुतार यांनी या निधीतून ६८ कामे प्रस्तावित करीत तसा ठरावही केला. हा ठराव ३१ मार्चपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला; पण मध्यंतरी महापालिकेत सत्तांतर होऊन राष्ट्रवादीचा महापौर व काँग्रेसकडे उपमहापौरपद आले. सात कोटींत आपल्या प्रभागातील कामे समाविष्ट करण्यात आली नसल्याच्या तक्रारी अनेक नगरसेवकांनी केल्या होत्या. त्यातून गीता सुतार यांनी नगरसेवकांना चोख प्रत्युत्तर दिल्याने वाद मिटला होता.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने सात कोटींतून कोणती कामे प्राधान्याने करावीत, याबाबत महापालिकेकडे अभिप्राय मागविला. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या हाती आयतेच कोलीत मिळाले. गतमहासभेत कामांचे प्राधान्यक्रम ठरविण्याचे अधिकार महापौरांना देण्यात आले. त्यानुसार आता ठराव समोर आला आहे. यात सव्वा कोटी रुपयांची कामे बदलण्यात आली आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसच्या बड्या नगरसेवकांनाच महापौरांनी दणका दिला आहे. कांँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांच्या वाॅर्डातील तब्बल ८० लाखांची कामे वगळली आहेत. यात राष्ट्रवादीच्या मनगू सरगर यांनी शिफारस केलेल्या कामांचाही समावेश आहे. भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांच्या वाॅर्डातील दोन कामे वगळली आहेत. एकूण १८ कामे बदलली असून, त्यांच्या जागी नव्याने कामे समाविष्ट केली आहेत. यात सर्वाधिक लाभ उपमहापौर उमेश पाटील यांच्या वॉर्डाला झाला आहे. त्यांच्या प्रभागातील जादा दोन कामे प्रस्तावित केली आहेत. याशिवाय वाॅर्ड २, २०, १८ मधील राष्ट्रवादीसमर्थक नगरसेवकांवरही महापौरांनी मेहेरनजर दाखविली आहे.
चौकट
माजी महापौरांना धक्का नाही
महापौर दिग्विजय सूर्यवंशी व माजी महापौर गीता सुतार यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे सुतार यांची कामे वगळली जातील, असा अंदाज होता. पण सूर्यवंशी यांनी त्यांच्या कामांना धक्का लावलेला नाही. त्रिकोणी बाग सुशोभीकरण, धबधबा ही प्रस्तावित कामे कायम ठेवली आहेत. केवळ एकच हाॅटमिक्स रस्त्याचे काम बदलले आहे.