पांडुरंग डोंगरे ल्ल खानापूर खानापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारांची निवड, पॅनलची रचना, कार्यकर्त्यांच्या बैठका यामध्ये सर्वच पक्षांचे प्रमुख व्यस्त झाले आहेत. खानापूर ग्रामपंचायत असताना नेहमी दुरंगी लढत झाली. मात्र नगरपंचायत स्थापन झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीस लागल्याने ‘खानापूर नगरपंचायतीची पहिली पंचवार्षिक निवडणूक’ बहुरंगी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खानापूर ग्रामपंचायत बरखास्त होऊन मार्च महिन्यात नगरपंचायत अस्तित्वात आली. मात्र नगरपंचायतीचे स्वरूप कसे असणार? निवडणूक कधी होणार? याबाबत कुतूहल निर्माण झाले होते. दोन-तीन महिन्यापूर्वी सतरा प्रभागांची रचना करून सतरा जागांसाठी आरक्षण टाकण्यात आले. तेव्हापासून इच्छुकांनी आपापल्या प्रभागात मोर्चेबांधणीस सुरूवात केली. प्रारंभी राजकीय हालचालींना वेग नव्हता. जेव्हा नगराध्यक्ष पदासाठी ‘खुला प्रवर्गा’चे आरक्षण पडले, तेव्हापासून राजकीय हालचालींना खरा वेग आला आहे. नगराध्यक्षपद खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने व ते सतरा सदस्यांमधून निवडण्यात येणार असल्याने खुला प्रवर्गासाठीचे प्रभाग ४, ९, ११, १६, १७ मधील इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. सतरा प्रभागांपैकी याच पाच प्रभागात खरी चुरस लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खुल्या आरक्षणामुळे अनेक मातब्बर उमेदवारी करण्याच्या तयारीस लागले आहेत. एकूण प्रभागात सर्वात मोठा प्रभाग १७ आहे. यामध्ये सर्वात जास्त ४२० मतदार आहेत. याच प्रभागात इच्छुकांची संख्याही जास्त आहे. तसेच सर्वात लहान प्रभाग ५ नंबरचा आहे. यामध्ये १५५ मतदार आहेत. हा प्रभाग खुला प्रवर्ग (स्त्री) साठी आरक्षित आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी प्रभाग ३ व ६ आरक्षित आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) साठी प्रभाग १, २ व १४ आरक्षित आहेत. अनु. जातीसाठी प्रभाग ७, तर अनु. जाती (स्त्री) साठी प्रभाग १५ आरक्षित आहेत. सातही आरक्षित प्रभागात इच्छुकांची संख्या जेमतेम आहे. त्यामुळे या प्रभागात उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षांना कसरत करावी लागणार आहे. सध्या सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीस लागले आहेत. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना स्वतंत्र पॅनेलच्या तयारीत आहेत. कॉँग्रेस पक्षातर्फे जि. प. सदस्य सुहास (नाना) शिंदे व माजी पं. स. सदस्य राजेंद्र माने एकत्र येऊन लढणार, का स्वतंत्र पॅनेलद्वारे लढणार! याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनेल उभे करण्यासाठी तालुकाध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी स्वत: लक्ष घालून विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड. गणेश देसाई, तर युवा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज भगत यांनीही पक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यामुळे खानापूर नगरपंचायतीसाठी चौरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. १९३७ मध्ये खानापूर ग्रामपंचायतीची स्थापना झाली. स्थापनेपासून २००२ चा अपवाद वगळता ग्रामपंचायतीवर माने गटाचीच सत्ता कायम राहिली आहे. पहिल्यावहिल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत विजय संपादन करून नगरपंचायतीवरही वर्चस्व राखण्यासाठी माने गटाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांतही सत्ता मिळविण्यासाठी तयारी सुरू आहे. मागील नगरपंचायतीत १३ जागापैकी एक जागा रिक्त होती. सहा जागा सत्ताधारी माने गटाकडे, तर सहा जागा विरोधी गटाकडे होत्या. त्यामुळे यावेळीही अटीतटीच्या निवडणुकीची शक्यता निर्माण झाली आहे. खानापूर नगरपंचायत स्थापनेमुळे खानापूर पं. स. व जि. प.मधील समावेश नसल्याने खानापूर तालुक्यातील जि. प.ची एक जागा, तर पं. स.च्या दोन जागा कमी झाल्या आहेत. नगरपंचायतीसाठी शासनाचा निधी थेट येणार असल्याने खानापूरच्या विकासास गती मिळणार आहे. खानापूर ग्रामपंचायतीची इमारत जुनी व मोडकळीस आली आहे. नूतन सदस्यांना सर्वप्रथम नगरपंचायत इमारतीचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. गावातील पाण्याचा प्रश्न सोडवणे, नवीन वसाहतीत गटारी व रस्ते तयार करणे, शासकीय कार्यालयांना इमारती, स्वतंत्र भाजी मंडई, मटण मार्केट, शाळा इमारत, हिंदू स्मशानभूमी दुरूस्ती, गावठाण हद्द वाढ आदी महत्त्वाचे व गरजेचे प्रश्न सोडवण्याचे आव्हान असणार आहे.
खानापूर नगरपंचायतीसाठी चौरंगी लढत शक्य
By admin | Updated: October 29, 2016 00:00 IST