ग्रामपंचायतीतही जगतापांना धक्का

By Admin | Updated: July 30, 2015 00:30 IST2015-07-29T23:38:21+5:302015-07-30T00:30:28+5:30

बाजार समितीकडे लक्ष : सुरेश शिंदे, विक्रम सावंत यांच्या आक्रमकतेने कार्यकर्ते रिचार्ज

Pushtas Jagtap in Gramapanchayat | ग्रामपंचायतीतही जगतापांना धक्का

ग्रामपंचायतीतही जगतापांना धक्का

जयवंत आदाटे-जत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपाठोपाठ जत तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला समाधानकारक यश मिळाले आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्ते पक्षाच्या प्रवाहात सक्रिय सहभागी होऊ लागले आहेत. बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे व जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी आमदार विलासराव जगताप यांना हा दुसरा धक्का दिला आहे. त्यामुळे आगामी बाजार समिती निवडणुकीत काय होणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक निकाल अनपेक्षित लागला. आमदार विलासराव जगताप विधानसभा निवडणूक निकालानंतर गाफील राहिले. त्याचा फायदा विक्रम सावंत यांना मिळाला. त्यामुळे ते विजयी झाले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाला उटगी, शेडशाळ, सिध्दनाथ, सिंगणहळ्ळी या गावांत एकहाती सत्ता मिळाली आहे. भाजपला तेथे एकही जागा मिळाली नाही. मेंढेगिरी, शेगाव, सनमडी, मायथळ, भिवर्गी, वळसंग, उटगी या गावांत भाजपचे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते व पंचायत समिती सदस्य आणि बाजार समितीचे माजी सभापती तेथील स्थानिक रहिवासी होते. गावातील स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यापेक्षा जत पंचायत समितीत येऊन ठाण मांडून बसणे, त्यांना राजकीयदृष्ट्या सोयीचे वाटत होते. आम्ही ग्रामीण भागातील कार्यकर्ते नसून शहरी भागातील नेतेच आहोत, अशा अविर्भावात ते वागत होते. त्याचा फटका आमदार विलासराव जगताप यांना बसला आहे.
तिकोंडी व धावडवाडी या दोन गावात भाजपला काठावरचे बहुमत मिळाले आहे. ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर होत नाहीत. स्थानिक राजकारण, तेथील प्रलंबित प्रश्न यावर जादा भर दिला जातो. परंतु काही गावांतील अपवाद वगळता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही गावात भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यासोबत युती करून ग्रामपंचायत निवडणूक लढविली नाही. अटी-तटीच्या लढती होऊन चुरशीने मतदान झाले. त्यानंतर निवडणूक निकाल बाहेर पडले आहेत.
भिवर्गी, शेगाव, उटगी, सनमडी, मायथळ, गुगवाड ही तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावे आहेत. या ग्रामपंचायती आता काँग्रेस पक्षाच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत. अल्पावधित भाजपला उतरती कळा का लागली आहे, यामागील नेमके कारण काय आहे, असा प्रश्न नागरिकांतून आता उपस्थित होऊ लागला आहे.
अल्पावधित बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतुष्ट कार्यकर्ते आणि उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालेले उमेदवार यांची चाचपणी करण्यास सुरेश शिंदे आणि विक्रम सावंत व माजी आमदार उमाजी सनमडीकर यांनी सुरुवात केली आहे. जिल्हा बँक व ग्रामपंचायत निवडणुकीत सलग दोनवेळा विजय मिळाल्यामुळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आता रिचार्ज झाले आहेत. आमदार विलासराव जगताप यांनी मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी नवीन उमेदवारांना संधी दिली आहे.
याशिवाय विरोधकांची चाल ओळखून त्यांनी सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. परंतु निवडणूक निकालानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर जत तालुक्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे.


५जगतापच टार्गेट...
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे राजकीय वातावरण शांत होत नाही तोपर्यंतच तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. पुत्र मनोज जगताप यांच्या अनपेक्षित पराभवामुळे जगताप यांनी ग्रामपंचायतींच्या मैदानातून वचपा काढण्याची तयारी चालविली होती. मात्र माजी आमदार उमाजी सनमडीकर, सुरेश शिंदे व विक्रम सावंत यांनी आणि काँग्रेसच्या इतर मान्यवरांनी एकत्रितपणे प्रत्येक गावात जाऊन काँग्रेस पक्षाची भूमिका पटवून देण्यात यश मिळविले. याशिवाय निवडणुकीदरम्यान आमदार विलासराव जगताप यांनाच मुख्य टार्गेट केले. त्यामुळे ते विजयी झाले होते. काँग्रेस पक्षाला उटगी, शेडशाळ, सिध्दनाथ, सिंगणहळ्ळी या गावांत एकहाती सत्ता मिळाली आहे. भाजपला तेथे एकही जागा मिळाली नाही.

हाय प्रोफाईल राजकारणाचा फटका
विलासराव जगताप यांच्या विधानसभेतील विजयानंतर भाजपवासी झालेले अनेक कार्यकर्ते सोयीनुसार भूमिका बदलत राहिले. परिणामी सामान्यांशी असलेली त्यांची नाळ तुटली. त्यांच्या हाय प्रोफाईल राजकारणाचा आणि समाजकारणाचा ग्रामीण भागातील नागरिकांना कंटाळा आला होता. त्यांनी त्यांची नाराजी मतपेटीतून उघड केली आहे.

Web Title: Pushtas Jagtap in Gramapanchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.