मंत्रीपद हुलकावणीने खाडेंना धक्का
By Admin | Updated: July 9, 2016 00:52 IST2016-07-08T23:55:21+5:302016-07-09T00:52:40+5:30
सुरेश खाडे यांची उपेक्षा : भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा पवित्रा
मंत्रीपद हुलकावणीने खाडेंना धक्का
सदानंद औंधे -- मिरज --मंत्रिमंडळ विस्तारात आ. सुरेश खाडे यांची मंत्रीपदावर वर्णी लागली नसल्याने आ. खाडे समर्थक नाराज आहेत. आ. खाडे यांना मंत्रीपद मिळाले नसल्याने ग्रामीण भागातील पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला आहे.
जिल्ह्यात राखीव मतदार संघातून तीनवेळा भाजपतर्फे विधानसभेत निवडून येणाऱ्या आ. सुरेश खाडे यांचा मंत्रीपदावर दावा होता. सलग दुसऱ्यांदा मिरजेतून विजय मिळविल्यानंतर आ. खाडे यांचे मंत्रीपदाच्या शर्यतीत नाव होते. आ. खाडे जिल्ह्याचे पालकमंत्री होणार, अशी ग्वाही देण्यात आली होती. मात्र आ. खाडे यांना गेली दोन वर्षे मंत्रिमंडळ विस्तारात प्रतीक्षेतच ठेवण्यात आले. जिल्ह्यातील चार आमदारांपैकी भाजपचा एकही मंत्री नसल्याने आ. खाडे यांची यावेळी तरी मंत्रिमंडळात वर्णी लागणार, अशी समर्थकांची खात्री होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी सख्य असतानाही आ. खाडे यांना यावेळीही मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आल्याने खाडे समर्थकांना चांगलाच धक्का बसला आहे. खा. संजय पाटील यांच्याशी आ. खाडे गटाचे सख्य नाही. आ. खाडे यांना मंत्रीपद देण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीसुध्दा मौन बाळगले. जिल्ह्यातील व मिरजेतील भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अडथळे आणल्याने आ. खाडे यांचे मंत्रीपद गेल्याचीही चर्चा आहे. आ. खाडे यांनी मंत्रीपदासाठी सरसंघचालकांसह वरिष्ठ नेत्यांकडून भाजप नेतृत्वावर दबाव आणल्यानंतरही एनवेळी त्यांचा पत्ता कट झाल्याने यामागे मोठे कारस्थान असल्याचा कार्यकर्त्यांचा संशय आहे. जिल्ह्यातून शिवाजीराव नाईक व आ. सुरेश खाडे यांच्यात मंत्रीपदासाठी चुरस असल्याचे अखेरपर्यंत चित्र होते. मात्र प्रत्यक्षात दोघांनाही मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. आ. खाडे यांची मंत्रीपदी वर्णी लागली नसल्याने मिरजेत काही भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला आहे. आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आ. खाडे यांना पक्षाने मंत्रीपद देणे आवश्यक होते. आ. खाडे यांची उपेक्षा कशासाठी? हे पक्षकार्यकर्त्यांना उमगलेले नाही. कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचे शहराध्यक्ष तानाजी घार्गे यांनी सांगितले.
कारण शोधावे लागेल : खाडे
मला मंत्रीपद न देण्याचे कारण समजलेले नाही. मंत्रीपद न मिळण्याचे कारण शोधावे लागेल. मात्र पक्षाने माझ्यावर अन्याय केलेला नाही. वरिष्ठ नेत्यांना पक्ष चालवायचा आहे. त्यादृष्टीने त्यांनी मंत्रीपद कोणाला द्यायचे याचा निर्णय घेतला आहे. मला मंत्रीपद मिळू नये यासाठी पक्षातील कोणी नेत्यांनीही अडथळा आणलेला नाही किंवा पक्षाचा पदाधिकारी असल्याने मंत्रीपद मिळाले नाही, असेही नाही. मंत्रीपद नसले तरी माझे काम सुरूच राहील. आता पुढील विस्तारावेळी संधी मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे आ. सुरेश खाडे यांनी सांगितले.