आभासी सुखासाठी शहरी भागाकडे ओढा
By Admin | Updated: November 30, 2015 01:13 IST2015-11-29T23:58:50+5:302015-11-30T01:13:50+5:30
रणधीर शिंदे : ‘बांडगूळ आख्यान’ कादंबरीवर सांगलीत चर्चासत्र

आभासी सुखासाठी शहरी भागाकडे ओढा
सांगली : वाढत्या अपेक्षांनी खेड्यातील जनतेचा शहराकडे वाढत चाललेला ओढा आणि त्यामुळे खेडी उद्ध्वस्त होत असताना, खेड्यात होणारा बदल अपरिहार्य आहे. गावाकडे आयुष्य काढलेल्यांनाही आता खेडी असुरक्षित वाटू लागल्याने गावांचा चेहरा हरवत चालला असून, आभासी सुखाच्या नादात खेड्यातील जनतेचा शहराकडे ओढा वाढत असल्याची खंत डॉ. रणधीर शिंदे यांनी रविवारी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा सांगली आणि मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोहन पाटील यांच्या ‘बांडगूळ आख्यान’ या कादंबरीवर आयोजित चर्चेत शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. तारा भवाळकर होत्या. डॉ. शिंदे पुढे म्हणाले, गाव, समाज तंत्र आणि सर्वच धोरणात बदल होत आहे. या बदलाचा आवाका समजून घेणे आवश्यक आहे. गावच्या जमिनी व निसर्ग संपत्तीवर बड्यांचा डोळा असल्याने खेडी बदलत आहेत. स्थानिक परंपरा नाहीशा होत असल्यानेही परिणाम दिसून येत आहे. आभासी सुखाच्या नादात गावाकडील लोक शहराकडे वळत असल्याचे सांगत मोहन पाटील यांनी ‘बांडगूळ आख्यान’ कादंबरीतून ग्रामीण भागातील चित्र प्रभावीपणे मांडल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ समीक्षक वैजनाथ महाजन म्हणाले, ४६ टक्के जनता आता ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतरित होत आहे अथवा विचारात आहे. मोठ्या अपेक्षेने शहाराच्या ओढीने चाललेल्या जनतेचे मन रमत नसल्याचे चित्र आहे. मोहन पाटील यांनी लिहिलेल्या या कादंबरीतून शहरी आणि ग्रामीण भाषेचा पट चांगल्या पध्दतीने मांडण्यात आलेला आहे. समकालीन मराठी साहित्यात महत्त्वाची कादंबरी म्हणूनही या कादंबरीचा उल्लेख व्हावा लागेल, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
यावेळी प्रा. बापू जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य आर. जी. कुलकर्णी, डॉ. अनिल मडके यांच्यासह साहित्य परिषदेच्या सांगली शाखेचे सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)