दसऱ्याला ‘छप्पर फाड के’ खरेदी उच्चांक
By Admin | Updated: October 24, 2015 00:27 IST2015-10-23T23:29:14+5:302015-10-24T00:27:24+5:30
सोन्याची झळाळी कायम : दुचाकी वाहनांची जोरदार विक्री; सांगलीत २०० कोटींची उलाढाल

दसऱ्याला ‘छप्पर फाड के’ खरेदी उच्चांक
सांगली : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याला ग्राहकांकडून मिळालेल्या ‘छप्पर फाड के’ प्रतिसादामुळे बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण झाले. सोन्याचे दर स्थिर असल्याने सुमारे दोन कोटींची उलाढाल झाली, तर दसऱ्याला रस्त्यावर दोन हजारावर दुचाकी, तर सहाशे चारचाकी वाहने आली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व मंदीच्या सावटाखाली बाजारपेठ असतानाही, सोने-चांदी, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चांगली विक्री झाल्याने विक्रेत्यांनी दिवाळीअगोदरच ‘दिवाळी’ साजरी केली. बाजारपेठेत २०० कोटींची उलाढाल झाल्याचे दिसून आले.
बाजारपेठेला खऱ्याअर्थाने सावरणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक दसरा सणाला यावर्षी चांगलीच खरेदी झाल्याचे दिसून आले. खरेदीमध्ये सोने-चांदी, दुचाकी वाहने, एलसीडी टीव्ही, लॅपटॉप आणि घरगुती उपयोगाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना जास्त मागणी होती. सोन्याचे भाव स्थिर असल्याने सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.
दसरा सणाला सोने खरेदीला विशेष महत्त्व असते. यावर्षी उसाची बिले थकल्याने आणि उर्वरित भागात दुष्काळी परिस्थिती असल्याने सोने खरेदीला यथातथाच प्रतिसाद मिळेल अशी शक्यता असताना, खरेदीदारांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली होती. येत्या काही दिवसात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता असल्याने खरेदीत वाढ झाल्याचे सांगत सराफ बाजारात दसऱ्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने, पावणेदोन ते दोन कोटींपर्यंत उलाढाल झाल्याचे सांगली जिल्हा सराफ संघटनेचे सेक्रेटरी पंढरीनाथ माने यांनी सांगितले.
यंदाच्या दसरा सणाच्या उत्साहात भर घालण्यासाठी फायनान्स कंपन्यांनी सुलभ कर्जपुरवठा केल्याने मोटारसायकलींच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले. दुचाकींमध्ये हिरोच्या १८०० गाड्यांची विक्री झाली. सिध्दीविनायक हिरोचे श्रीकांत तारळेकर यांनी सांगितले की, शोरूम व आमच्या सबडीलरकडून बाराशेवर वाहनांची विक्री झाली आहे. बाजारावर मंदीचे सावट असले तरी खरेदीला ग्राहकांनी अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद दिला. यापेक्षा जादा प्रतिसाद दिवाळीला मिळेल.
पोरेज टीव्हीएसचे अविनाश पोरे म्हणाले, दसऱ्याला ग्राहकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. मंदी जाणवली नाही. आमच्याकडील अनेक गाड्यांचे बुकिंग असताना, ते पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झालो. टीव्हीएसच्या ६७५ गाड्यांची विक्री झाली.
ट्रायकलर होंडाचे मगदूम म्हणाले, ग्राहकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. दसऱ्याला ४७५ गाड्यांची विक्री झाली. मंदी थोडीफार जाणवली असली तरी चांगला प्रतिसाद मिळाला.
चारचाकी गाड्यांमध्ये मारूती सुझुकीने आपला दरारा कायम ठेवल्याचे दिसून आले. मारूतीच्या १४३ गाड्यांची विक्री झाल्याचे चौगुले इंडस्ट्रिजचे सिनियर सेल्स मॅनेजर नीलेश पोतदार यांनी सांगितले. दिवाळीसाठी ५० हून अधिक गाड्यांचे बुकिंग झाल्याचेही त्यांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये एलईडी टीव्हींना जादा मागणी असल्याचे दिसून आले. अनेक कंपन्यांनी जुन्या टीव्हीच्या बदल्यात एल.ई.डी.ची योजना ठेवल्याने ग्राहकांचा टीव्ही एक्स्चेंजकडे कल दिसून आला. इलेक्ट्रॉनिकमध्ये दीड ते दोन कोटींपर्यंत उलाढाल झाली. बाजारात नव्याने आलेल्या फोर के एल.ई.डी. टीव्हीस चांगली पसंती होती. ग्राहकांचा फायनान्स योजनेकडे जादा ओढा असल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षापासून एल.ई.डी.च्या विक्रीत वाढच होत असल्याचे सुयोग राजेंद्र डिजिटलचे विजय लड्डा यांनी सांगितले.
एल.ई.डी.बरोबरच फ्रिजना मागणी होती. मात्र, तुलनेने फ्रिजची विक्री कमी झाली. दिवाळीला फ्रिजची विक्री वाढणार असल्याचे संकेत विक्रेत्यांनी दिले. (प्रतिनिधी)
रियल इस्टेटमध्ये ‘मंदीमध्ये संधी’ : बुकिंगला प्रतिसाद
दसऱ्याच्या मुहूर्तावर स्थावर मिळकतींमध्ये गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा ओढा आहे. बांधकाम क्षेत्रावर काही प्रमाणात मंदीचे सावट असले तरी, अनेकांनी फ्लॅटच्या बुकिंगसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधला. दिवाळीच्या पाडव्याला बांधकाम क्षेत्रात चांगली उलाढाल होण्याचे संकेत बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केले.
‘आॅनलाईन’ने व्यापली बाजारपेठ
दसरा सणाच्या अगोदरच आॅनलाईन विक्री करणाऱ्या संकेतस्थळांनी ४० ते ७० टक्क्यांपर्यंत सवलतींचा वर्षाव करीत जाहिरात केल्याने त्यास सांगलीकर ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. दसरा सणाची वस्तूंची डिलिव्हरी देण्यासाठी अनेक कंपन्यांनी जादा कामगारांची नेमणूक केली होती. आॅनलाईन मार्केटमध्ये मोबाईलना जादा मागणी असल्याचे दिसून आले. त्याबरोबरच दैनंदिन वापराच्या वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही मागणी होती.
दुष्काळाचे सावट व दुसऱ्या बाजूला उसाची बिले थकल्याने दसरा सणाला सोने खरेदीला यथातथाच प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. पुढील महिन्यात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी सोने खरेदीकडे कल वाढवला. सोने खरेदीत दागिन्यांच्या खरेदीकडेच ग्राहकांचा कल जादा होता. दीपावलीलाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.
- पंढरीनाथ माने, सचिव,
सांगली जिल्हा सराफ असोसिएशन.
कमी व्याजदरात सुलभ अशा योजना वित्तीय संस्थांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांनी दुचाकी वाहनांची चांगलीच खरेदी केल्याचे दिसून आले. लहान व घरातील प्रत्येकाला वापरता येतील अशा वाहनांच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा दिसून आला. त्यामुळेच दुचाकी गाड्यांची चांगली विक्री झाली. दिवाळीसाठीही आतापासूनच ग्राहकांकडून बुकिंग चालू झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.
- श्रीकांत तारळेकर,
सिध्दीविनायक हिरो