आधारभूत किमतीलाच धान्याची खरेदी करावी
By Admin | Updated: November 28, 2014 23:48 IST2014-11-28T22:45:16+5:302014-11-28T23:48:10+5:30
..अन्यथा कारवाई : प्रशासकांचा इशारा

आधारभूत किमतीलाच धान्याची खरेदी करावी
तासगाव : शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीलाच शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्यात यावे, अन्यथा बाजार समिती कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा तासगाव बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक शंकर पाटील यांनी व्यापाऱ्यांना दिला.
बाजार समिती आवारातील व्यापारी, शेतकऱ्यांच्या दराबाबत आयोजित केलेल्या बैठकीत शंकर पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताची आहे. शेतकऱ्यांचे हित हेच बाजार समितीचे हित असते. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होईल असे कृत्य करू नये. तसे आढळून आल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून शेतकरी बाजार समितीत माल घेऊन येतो. शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा कमी दराने कोणत्याही व्यापाऱ्याने माल खरेदी करू नये, यावर बाजार समितीचे बारकाईने लक्ष राहणार असल्याचेही शंकर पाटील म्हणाले. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)
शेतकऱ्यांनी संपर्क साधावा!
बाजार समिती आवारात काही अडचणी निर्माण झाल्या, तर शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीशी संपर्क साधावा, शेतकऱ्यांची कोणत्याही बाबतीत फसवणूक तसेच पिळवणूक होणार नाही, याकडे बाजार समिती विशेष लक्ष देणार आहे, असेही शंकर पाटील यांनी सांगितले.