चुकीचे वागणाऱ्या पोलिसांनाही शिक्षा
By Admin | Updated: June 14, 2016 00:05 IST2016-06-13T23:53:07+5:302016-06-14T00:05:35+5:30
दत्तात्रय शिंदे : चांगले काम करून बक्षीस मिळविण्याचे अधिकाऱ्यांच्या बैठकीत आवाहन

चुकीचे वागणाऱ्या पोलिसांनाही शिक्षा
सांगली : चांगले काम करा, बक्षीस मिळवा. पण वाईट काम केल्यास तुम्हाला शिक्षा करायला हयगय करणार नाही, असा इशारा नूतन जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी सोमवारी पोलिस अधिकाऱ्यांना दिला. कामात निष्काळजीपणा नको. पोलिस ठाण्यात येणाऱ्या सर्वसामान्याला सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली.
जिल्हा पोलिसप्रमुख पदाची सूत्रे घेतल्यानंतर २४ तासांच्या आतच शिंदे यांनी सोमवारी सकाळी जिल्ह्यातील २५ पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांची तातडीने मुख्यालयात बैठक घेतली. पहाटे चार वाजताच अधिकाऱ्यांना बैठक असल्याचा निरोप देण्यात आला होता. त्यामुळे अधिकाऱ्यांची पहाटेपासूनच धावपळ सुरू होती. बैठकीतील माहिती देताना शिंदे म्हणाले की, सर्व अधिकाऱ्यांना कामाची रुपरेषा कशी असावी, याबद्दल मार्गदर्शन केले आहे. जिल्ह्यातील बेकायदेशीर धंदे बंद झाले पाहिजेत. यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली आहे. पथकाने एखाद्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर धंद्यावर छापा टाकला, तर त्याला संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यास जबाबदार धरले जाईल. ज्याअर्थी धंदे सुरु असल्याचे छाप्यात उघडकीस येते, त्याअर्थी संबंधित ठाण्याच्या अधिकाऱ्याचे त्याला अभय असल्याचे स्पष्ट होईल. त्यामुळे बेकायदेशीर धंदे कोणत्याही प्रकारचे असोत, ते बंद झाले पाहिजेतच.
शिंदे म्हणाले, जिल्ह्यात खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. यातील अनेक गुन्ह्यांचा छडा लागला नाही. या प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हा घडला की, तो तातडीने दाखल करण्याची सूचना केली आहे. कोणाच्या दबावाखाली गुन्हे दाखल करु नयेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास नेहमीच प्राध्यान्य दिले पाहिजे. एखादी माहिती मिळाली, तर त्याची तातडीने खातरजमा करावी. यासाठी जनतेशी संपर्क ठेवला पाहिजे. दैनंदिन कोणतेही काम असो, यामध्ये निष्काळजीपणा करु नये. चांगले काम केल्यास नेहमीच पाठीवर शाबासकीची थाप मिळेल, तसेच बक्षीसही दिले जाईल. पण वाईट काम केल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षा करायला हयगय करणार नाही, असा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)
शिंदे म्हणाले, वाहतूक नियम चांगल्याप्रकारे करावेत, अशी सूचना केली आहे. वाहनधारकांना मुद्दाम अडवून, त्रास देऊ नये. वाहतुकीची कोंडी होऊ नये, अपघात घडू नयेत, याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत समस्या असल्यास त्या जरूर मांडाव्यात, असेही सांगितले आहे.
दलाची अबू्र : ठाणे अंमलदाराच्या हाती
शिंदे म्हणाले, पोलिस ठाण्यात येणारा माणूस हा सामान्य तक्रारदार असतो. अनेकदा काही लोकांनी पोलिस ठाण्याची पायरीही चढलेली नसते. त्यामुळे तो दबकतच येतो. तो आल्यानंतर प्रथम त्याला ठाणे अंमलदाराची खोली दिसते. तिथे तो जातो. त्यामुळे ठाणे अंमलदाराने येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी सौजन्याने वागावे. ठाणे अंमलदाराकडून मिळणारी वागणूक ही सौजन्याची असली पाहिजे. याबाबत माझ्याकडे तक्रार येता कामा नये. तक्रारदाराचे ऐकून घेतले पाहिजे. गुन्हा दाखल होत असेल तर दाखल करावा. होत नसेल तर त्याला समजावून सांगावे, अशी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. पोलिस दलाची जी अब्रू आहे, ती ठाणे अंमलदाराच्या हातात आहे. तिथे मिळणारी वागणूक ही महत्त्वाची असते.
सिंधुदुर्गला बक्षिसासाठी निधी कमी पडला...
शिंदे म्हणाले, सिंधुदुर्ग येथे असताना चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बक्षीस देताना कमी पडलो नाही. बक्षिसाचा निधी मर्यादित असतो. पण तोही संपला. पण मार्च २०१६ मध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठवून आणखी पाच लाखाचा निधी मंजूर करुन घेतला. त्यामुळे सांगली पोलिस दलातील अधिकाऱ्यांनीही नेहमीच चांगले काम करावे. त्यांना बक्षीस देण्यात कमी पडणार नाही.