पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी एसटी सेवा झाली पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:27 IST2021-07-28T04:27:05+5:302021-07-28T04:27:05+5:30
सांगली : महापुरामुळे थंडावलेली एसटी सेवा मंगळवारपासून अंशत: पूर्ववत झाली. शिराळा, इस्लामपूर मार्गांवरील फेऱ्या मात्र अद्याप सुरू झालेल्या नाहीत. ...

पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी एसटी सेवा झाली पूर्ववत
सांगली : महापुरामुळे थंडावलेली एसटी सेवा मंगळवारपासून अंशत: पूर्ववत झाली. शिराळा, इस्लामपूर मार्गांवरील फेऱ्या मात्र अद्याप सुरू झालेल्या नाहीत.
प्रामुख्याने कोल्हापूर व इचलकरंजी मार्गांवरील फेऱ्या मंगळवारी दुपारपासून सुरू झाल्या. सांगली-कोल्हापूर रस्त्यावर उदगाव रेल्वे पुलाजवळ पाणी आल्याने हा मार्ग बंद होता. मंगळवारी सकाळपासून पाणी उतरायला सुरुवात झाली. दुपारी रस्ता रिकामा झाल्याने एसटी सोडण्यात आली. सांगलीत शिवशंभो चौकातील पाणी अजूनही उतरलेले नाही, त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूकही थांबली होती. ती तासगाव, विटामार्गे सुरू करण्यात आली आहे. शिराळा व इस्लामपूरकडून येणाऱ्या गाड्या अद्याप सांगलीवाडीत टोलनाक्यापर्यंतच येत आहेत. सांगलीतून थेट वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही.
गेल्या चार दिवसांपासून बसस्थानकात पाणी साचले होते, त्यामुळे पूर्व भागातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडीसह सोलापूर, लातूरची वाहतूक कर्मवीर चौकापर्यंत येत होती. तेथूनच गाड्यांचे नियोजन केले जात होते. सोमवारी रात्री स्थानकातील पाण्याचा निचरा झाला. त्यानंतर महापालिकेच्या पाण्याच्या टँकरने स्थानकाची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे ही वाहतूकही स्थानकातून सुरू झाली आहे.