पाडळीत शिवाजीराव नाईक गटाला खिंडार
By Admin | Updated: September 22, 2015 00:09 IST2015-09-21T23:12:32+5:302015-09-22T00:09:26+5:30
ग्रामपंचायत निवडणूक : नऊपैकी पाच सदस्य राष्ट्रवादीचे; नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

पाडळीत शिवाजीराव नाईक गटाला खिंडार
शिराळा : पाडळी (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीमध्ये आ. शिवाजीराव नाईक गटाला खिंंडार पाडत माजी सरपंच व विद्यमान सदस्य आक्काताई सर्जेराव नलवडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीमध्ये नऊपैकी पाच सदस्य राष्ट्रवादीचे झाले आहेत. ग्रामपंचायतीत सत्तांतराची शक्यता वर्तवण्यात येत आहे.ग्रामपंचायत सदस्य आक्काताई नलवडे, सर्जेराव नलवडे, दीपक नलवडे यांनी माजी आमदार मानसिंंगराव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा सत्कार माजी आमदार नाईक यांच्याहस्ते झाला.
नाईक म्हणाले की, तालुक्याच्या उत्तर भागातील पाडळी हे महत्त्वाचे गाव आहे. ग्रामपंचायत सदस्य सौ. नलवडे व त्यांच्या समर्थकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल मी त्यांचे स्वागत करतो. सर्व वेळ राजकारणाचा विचार करण्यापेक्षा सामाजिक कामास महत्त्व देऊन काम करणारे कार्यकर्ते महत्त्वाचे असतात. गेल्या पाच वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना माझ्याकडून झालेला विकास व सध्याची परिस्थिती याची तुलना जनता करू लागली आहे. पराभवाने खचून न जाता सामाजिक कार्यात मी अखंडपणे कार्यरत आहे.
यावेळी विराज कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील, माजी सरपंच अशोक पाटील, सोसायटीचे माजी अध्यक्ष शांताराम पाटील, अरुण पाटील, अशोकराव पाटील, अमृत, मोहन, विजय, बबन, रवींद्र, प्रणव, गणपत पाटील, विलास गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
पराभवाने खचणार नाही
झालेला विकास व सध्याची परिस्थिती याची तुलना जनता करत आहे. पराभवाने खचून न जाता सामाजिक कार्यात कार्यरत राहणार आहे, असे नाईक म्हणाले.