व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अचानक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST2021-08-29T04:26:41+5:302021-08-29T04:26:41+5:30
सांगली : महापुरातील नुकसानीबद्दल शासनाने जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नाही. त्यातच अचानक व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे बंद केले आहेत. ...

व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अचानक बंद
सांगली : महापुरातील नुकसानीबद्दल शासनाने जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नाही. त्यातच अचानक व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे बंद केले आहेत. चौकशी केल्यानंतर शासकीय उत्तरे दिली जात आहेत, अशी माहिती व्यापारी एकता असोसिएशनचे प्रमुख समीर शहा यांनी दिली.
त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊन असतानाच महापूर आला. पूर ओसरून महिना झाला, पण अद्याप तातडीची मदत मिळालेली नाही. अद्याप बऱ्याच व्यापारी बांधवांचे पंचनामे झालेले नसताना अचानक प्रशासनाने पंचनामे बंद केले आहेत. त्याबाबत चौकशी केल्यानंतर मिरजेच्या तहसीलदारांशी संपर्क साधा किंवा पत्र पाठवा, असे उत्तर मिळत आहे. प्रशासनाला व शासनाला नक्की व्यापाऱ्यांना मदत करायची आहे की त्रास द्यायचा आहे, हे प्रशासनाने स्पष्ट करावे.
प्रलंबित असलेले पंचनामे होऊन नक्की मदत कधी मिळणार आहे का, गरज असताना मदत मिळाली, तर ती तोकडी का असेना कामाला येत असते, पण काहीच दिलासादायक चित्र नाही. महापालिका, जिल्हा प्रशासन, राज्य शासन यांच्याकडून व्यापाऱ्यांना कवडीची मदत मिळालेली नाही.
सांगलीची बाजारपेठ स्थलांतर, पुनर्वसन अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आम्ही विस्तारीकरणावर जोर द्यावा व तातडीने यावर चर्चा सुरू व्हावी, अशी मागणी केली होती, पण यावर कोणतेही आणि कसलेही भाष्य कोणीही करत नाही. पुढील महापुराच्या उंबरठ्यावर असतानाच पुन्हा चर्चा सुरू होईल. ‘रात गयी बात गयी’ याचा अनुभव नवीन नाही.
जिल्हा बँकेमार्फत व्यापाऱ्यांना ५ ते ६ टक्क्यांनी कर्जवाटप करणार असे शासनाने जाहीर केले होते, पण कधी व किती कर्ज मिळणार, कुणाला मिळणार, याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट नाही. नक्कीच या ठिकाणची बाजारपेठ विस्तारित, विकसित व उर्जितावस्थेला येण्यासाठी नक्की कोण आणि काय ठोस प्रयत्न करणार, कोणती उपाययोजना करणार आहात, याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शहा यांनी केली आहे.