पुणदी सिंचन योजना बंदच!

By Admin | Updated: November 25, 2014 23:47 IST2014-11-25T22:45:34+5:302014-11-25T23:47:15+5:30

कोट्यवधीचा खर्च : योजना सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

Punch irrigation scheme closed! | पुणदी सिंचन योजना बंदच!

पुणदी सिंचन योजना बंदच!

संजयकुमार चव्हाण = मांजर्डे तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी भागाच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन सुरू करण्यात आलेली पुणदी उपसा सिंचन योजना गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे ही योजना कधी सुरू होणार? अशी चर्चा आरवडे, बलगवडे आदी गावांतून होताना दिसत आहे.
पुणदी उपसा सिंचन योजना ही तब्बल ३०० कोटी रुपये खर्च करुन सुरू करण्यात आली होती. केवळ १३ महिन्यात ही योजना पूर्ण करुन विधानसभेपूर्वी सुरू केली होती. या योजनेचा फायदा पूर्व भागातील शेतीला होणार असल्याने या भागातील बळिराजा सुखावला होता. पूर्व भागातील सात हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तब्बल १७ गावांना या योजनेचा फायदा होणार आहे, असे चित्र होते. ही योजना सुरू झाल्यावर या भागातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जोमाने द्राक्षबागा उभ्या केल्या आहेत. ऊस, गहू, भाजीपाला आदी पिकांची लागण केली आहे. परंतु गेल्या दीड महिन्यापासून ही योजना बंद असल्याने या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
पुणदी उपसा सिंचन योजनेचे पाणी लोढे, सिद्धेवाडी तलावामध्ये सोडण्यात आले आहे. आरवडे, डोर्ली आदी गावांची शेती लोढे तलावावरच अवलंबून आहे. परंतु रब्बी हंगाम सुरु झाल्याने या तलावातून पाणी उपसा सुरू झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन-तीन महिन्यात या तलावातील पाणी पातळी कमी होणार आहे. लोढे तलावाची क्षमता १६६.७० द.ल.घ.फूट आहे, तर त्यामध्ये उपलब्ध पाणीसाठा १०५.५९ द.ल.घ.फूट आहे.
तसेच या तलावामधून राष्ट्रीय पेयजल योजनेतून आरवडे व चिंचणी गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या दोन योजना सुरू आहेत. त्यासाठी ११.०८ द.ल.घ.फूट पाणी आरक्षित ठेवले जाणार आहे. त्यामुळे पुणदी उपसा सिंचन योजना सुरू होणे गरजेचे आहे.
पुणदी उपसा सिंचन योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी काही शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता, पाणी मागणी अर्ज आल्याशिवाय योजना सुरू होणार नाही, असे सांगण्यात येते. तसेच त्यासाठी लागणारी रक्कम ही शेतकऱ्यांनी भरावयाची आहे, तरच ही योजना पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.


शेतकरी अडचणीत
२००० पासून तीनवेळा दुष्काळाचा सामना या भागातील शेतकरी करीत आहेत. हजारो एकर बागायती क्षेत्र उद्ध्वस्त झाले होते. पण पुन्हा एकदा या योजनेमुळे शेतकऱ्यांनी जोमाने बागायती शेती उभी केली आहे.
द्राक्ष, ऊस, भाजीपाला ही प्रमुख पिके या भागातून घेतली जातात. योजना चालू झाली नाही, तर या भागातील शेतीचे नुकसान पुन्हा एकदा होऊ शकते.
१५ दिवसांपूर्वी आरफळच्या कालव्यातून पाणी सुरू होते. परंतु त्यावेळी ही योजना सुरू केली गेली नाही.

Web Title: Punch irrigation scheme closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.