तासगाव : तासगाव पालिकेतील नगराध्यक्षांच्या दालनातून आर. आर. आबांचे छायाचित्र भाजपच्या नगरसेवकांनी काढले आहे. अशा कारनाम्यांना जनताच उत्तर देईल, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कृत्याचा निषेध केला. तासगाव मार्केट यार्ड परिसरात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. तासगाव नगरपालिकेत नगराध्यक्षांच्या दालनात माजी गृहमंत्री आर. आर. आबांचे छायाचित्र लावण्यात आले होते. मात्र भाजपच्या नगरसेवकांनी हे छायाचित्र काढून त्याठिकाणी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे छायाचित्र लावले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. आबांच्या प्रयत्नांमुळे आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी केलेले हे कृत्य निषेधार्ह आहे. आबांनी स्वच्छता अभियान, डान्सबार बंदीसह अन्य अनेक कामांमुळे राज्यासह देशाला आदर्श घालून दिला आहे. राज्यभर विरोधकदेखील त्यांचा आदर करतात; मात्र तासगावात त्यांचे छायाचित्र काढण्याची घटना लाजीरवाणी आहे. सामान्य जनतेच्या मनात आबांविषयी आदर आहे. त्यामुळे शहरातील जनताच या नगरसेवकांना उत्तर देईल, अशा शब्दांत निषेध करण्यात आला. बैठकीस राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंत देसाई, बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील, पालिकेचे उपनगराध्यक्ष सुरेश थोरात, नगरसेवक अमोल शिंदे, गजानन खुजट, तुकाराम कुंभार, बशीर मोमीन, राहुल कांबळे, अभिजित माळी, कमलेश तांबवेकर, स्वप्नील जाधव, लालासाहेब पाटील, यासिन मुल्ला, रशिद मुल्ला, इद्रिस मुल्ला, अभिजित पाटील, रोहन पवार, प्रसाद पैलवान आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
भाजपच्या कारनाम्यांना जनताच उत्तर देईल
By admin | Updated: November 1, 2015 00:01 IST