वीज सवलतीची सार्वजनिक सेवा

By Admin | Updated: August 17, 2014 00:44 IST2014-08-17T00:43:01+5:302014-08-17T00:44:19+5:30

नवा आदेश : शासकीय कार्यालये, खासगी दवाखान्यांना सवलत

Public services of electricity concessions | वीज सवलतीची सार्वजनिक सेवा

वीज सवलतीची सार्वजनिक सेवा

सदानंद औंधे -  मिरज
शासकीय कार्यालयांसह खासगी दवाखान्यांना आता व्यावसायिक वापराऐवजी सार्वजनिक सेवा म्हणून सवलतीच्या दरात वीज मिळणार आहे. विद्युत नियामक आयोगाच्या आदेशाप्रमाणे सर्व शासकीय कार्यालये, खासगी दवाखाने, रेल्वेस्थानक, बसस्थानकांना सार्वजनिक सेवा दरात विजबिल आकारणी होणार आहे.
शासकीय कार्यालये, खासगी दवाखान्यांना व्यावसायिक वापर या श्रेणीत विद्युतदर आकारण्यात येतो. सार्वजनिक सेवा देणाऱ्या कार्यालयांना व दवाखान्यांना व्यावसायिक दराऐवजी कमी दराने विद्युतपुरवठा करण्याची मागणी विद्युत नियामक आयोगाने मान्य केली आहे. यामुळे खासगी दवाखान्यांचेही विजेचे बिल कमी होणार आहे. व्यावसायिक व खासगी याशिवाय सार्वजनिक सेवा या तिसऱ्या श्रेणीत प्रतियुनिट ९ रुपये व्यावसायिक दरात प्रतियुनिट ५० पैसे घट होणार आहे. २० ते ५० किलो वॅट जोडणी व जादा विद्युत वापर असलेल्या दवाखान्यांची प्रतियुनिट तीन रुपयांपर्यंत बचत होणार आहे. रेल्वेस्थानक, एसटी स्थानकातील दुकाने वगळता अन्य वीज वापराची आकारणी सार्वजनिक सेवा दराने होणार आहे. पोलीस ठाण्यासह सर्व शासकीय कार्यालयांचेही वीज बिल कमी होणार आहे.
राज्य विद्युत नियामक आयोगाच्या आदेशाप्रमाणे व्यावसायिक वापराऐवजी बिल सार्वजनिक सेवादरात वीज बिल आकारणीसाठी महावितरणकडे अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करणाऱ्या शासकीय कार्यालयांना किवा खासगी दवाखान्यांनाच सार्वजनिक सेवा दराचा लाभ मिळणार असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले. मंदिर, मशीदसह धार्मिक स्थळांना घरगुती दराने वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र गणेशोत्सव, नवरात्रौत्सवासाठी व सण उत्सवांसाठी सार्वजनिक मंडळांना घरगुतीपेक्षा कमी दराने केवळ अडीच रुपये प्रतियुनिट दराने तात्पुरता वीजपुरवठा उपलब्ध आहे. मात्र सार्वजनिक मंडळे तात्पुरती वीज जोडणी न घेता वीज ग्राहकांच्या विद्युतपुरवठ्याचा वापर करतात. शाळांना घरगुती दरानेच वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र वसतिगृहासाठी पैसे आकारणाऱ्या शाळांना व्यावसायिक दरानेच वीजपुरवठा होणार आहे.

Web Title: Public services of electricity concessions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.