सागावमध्ये पूरग्रस्तांना शासकीय मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:32 IST2021-09-16T04:32:23+5:302021-09-16T04:32:23+5:30
फोटो ओळ : सागाव (ता. शिराळा) येथील पूरग्रस्तांनी सानुग्रह अनुदान मिळावे या मागणीचे निवेदन शिराळा नायब तहसीलदार सचिन कोकाटे ...

सागावमध्ये पूरग्रस्तांना शासकीय मदत द्या
फोटो ओळ : सागाव (ता. शिराळा) येथील पूरग्रस्तांनी सानुग्रह अनुदान मिळावे या मागणीचे निवेदन शिराळा नायब तहसीलदार सचिन कोकाटे यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : सागाव (ता. शिराळा) येथे महापुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाचे सानुग्रह अनुदान द्यावे. तसेच, पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकर मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत नायब तहसीलदार सचिन कोकाटे यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, दि. २२ ते २४ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला महापूर आला होता. या महापुराचे पाणी सागाव येथील २५५ कुटुंबांच्या घरांमध्ये शिरले होते. या सर्व कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले होते. शासनाने अशा कुटुंबांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता प्रशासनाकडे संबंधित नागरिकांनी केली आहे. महापूर ओसरून दोन महिन्यांचा कालावधी झाला, तरी शासनाचे सानुग्रह अनुदान दिले नाही. त्याचबरोबर महापुरामुळे झालेल्या घरांची पडझड, पिकांचे नुकसानीची भरपाई अद्यापपर्यंत मिळाली नाही. यामुळे पूरबाधित कुटुंबे व शेतकरी पूर्णतः अडचणीत आला आहे. शासनाने तत्काळ मदत द्यावी, अन्यथा शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
या वेळी संग्राम पवार, संजय संकपाळ, बाबासाहेब लोहार, भीमराव पवार, महादेव पवार, श्रीकांत दिवे, अजित दिवे, किशोर दिवे, बापू पाटील, विष्णू खवरे, संजय खवरे, सतीश शेवडे, आप्पा लोहार, भीमराव तिके, स्वप्निल लोहार, कृष्णा खवरे, नीलेश पाटील, सुरेश लोहार आदी उपस्थित होते.