सांगलीत आयटक कामगार संघटनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST2021-03-17T04:26:59+5:302021-03-17T04:26:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व सेवांच्या खासगीकरण धोरणाचा निषेध करीत मंगळवारी आयटक कामगार संघटनेच्यावतीने सांगलीत ...

सांगलीत आयटक कामगार संघटनेची निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व सेवांच्या खासगीकरण धोरणाचा निषेध करीत मंगळवारी आयटक कामगार संघटनेच्यावतीने सांगलीत जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
सांगलीच्या स्टेशन चौकात सकाळी कॉ. शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पुजारी म्हणाले की, सार्वजिनक क्षेत्रातील सर्व सेवांचे खासगीकरण, अन्यायी कृषी कायदे, श्रमसंहिता, नवीन शैक्षणिक धोरण, पेट्रोलजन्य पदार्थ व अन्य जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ या सर्व गोष्टी सामान्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या आहेत.
संपूर्ण देशभरातील किसान व कामगार संघटनांच्या कृती समित्यांनी खासगीकरण विरोधी दिवस पाळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आम्ही हे आंदोलन केले.
केंद्रातील मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या सात वर्षांत व विशेषतः गेल्या वर्षभरामध्ये शेतकरीविरोधी, कामगारविरोधी, कॉर्पोरेटधार्जिणे धोरण जास्तच आक्रमकपणे राबवायला सुरुवात केली आहे. संकटात सापडलेल्या कृषीला व शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आखण्याऐवजी शेती क्षेत्र कॉर्पोरेटसच्या ताब्यात देण्यासाठी संसदीय लोकशाही धाब्यावर बसवून तीन कृषी कायदे आणले गेले. कामगार विरोधी चार श्रमसंहिता मंजूर करून कामगारांनी गेल्या शंभर वर्षांत लढून मिळवलेले कामगार कायदे रद्द केले गेले. सत्तर वर्षांमध्ये देशातील जनतेच्या पैशांवर व श्रमावर उभ्या करण्यात आलेल्या सार्वजनिक उद्योग मर्जीतल्या उद्योगपतींना देण्यात येत आहेत. या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करीत आहोत.
आंदोलनात विजय बचाटे, सुमन पुजारी, वर्षा गडचे, अनिल मोटे, हनुमंत माळी, लक्ष्मी कारंडे, लाईव्ह गडवे, गोंडा पाटील आदी सहभागी झाले होते.