काँग्रेसतर्फे सांगलीत इंधन दरवाढीविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:23 IST2021-02-07T04:23:57+5:302021-02-07T04:23:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पेट्राेल, डिझेलच्या दरवाढीविरोधात शनिवारी काँग्रेसच्यावतीने निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. महागाई रोखण्याची ...

काँग्रेसतर्फे सांगलीत इंधन दरवाढीविरोधात निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पेट्राेल, डिझेलच्या दरवाढीविरोधात शनिवारी काँग्रेसच्यावतीने निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. महागाई रोखण्याची मागणी यावेळी काँग्रेस नेत्यांनी केली.
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, जितेश कदम, नामदेवराव मोहिते, उत्तम साखळकर आदी प्रमुख नेते उपस्थित होते. ‘इंधन दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’, ‘मोदी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, ‘नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.
यावेळी विश्वजीत कदम म्हणाले की, केंद्र सरकारने सत्तेवर आल्यापासून सामान्य माणसांचा कधीही विचार केला नाही. सध्या पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरचे दर आकाशाला भिडत आहेत. सामान्यांना महागाईने छळले आहे. हा छळ केंद्रातील मोदी सरकार करीत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत.
संपूर्ण कोरोना काळात सामान्य लोकांनी जगण्यासाठी संघर्ष केला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कपात झाली. अशा काळात सामान्यांसाठी काहीतरी चांगली धोरणे घेण्याची अपेक्षा केंद्र सरकारकडून होत्या. मात्र, केंद्र सरकारने सामान्य लोकांना महागाईची भेट देऊन त्यांची पिळवणूक करीत आहे, अशी टीका त्यांनी केली.
आंदोलनात नगरसेवक संजय मेंढे, नगरसेविका वहिदा नायकवडी, वर्षा निंबाळकर, प्रशांत पाटील, संतोष पाटील, अजित दोरकर, अभिजीत भोसले, बिपिन कदम, रवींद्र खराडे, अमित पारेकर आदी उपस्थित होते.
चौकट
शेतकऱ्यांची दया-माया नाही
विश्वजीत कदम म्हणाले की, दिल्लीच्या रस्त्यांवर लाखो शेतकरी महिनाभर आंदोलन करीत असताना केंद्र सरकार त्यांच्या मागण्यांची दखल घ्यायला तयार नाही. त्यांना या शेतकऱ्यांची दया-माया नाही. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.