मिरजेत खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:16+5:302021-06-18T04:18:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मिरज शहर सुधार समितीने मिरजेतील खराब रस्त्यांप्रश्नी संताप व्यक्त करीत खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले. लोकप्रतिनिधी ...

मिरजेत खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरज शहर सुधार समितीने मिरजेतील खराब रस्त्यांप्रश्नी संताप व्यक्त करीत खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले. लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या नावाने शंखध्वनी आंदोलनही करण्यात आले. याची दखल घेत महापालिकेने लगेच खड्डे भरण्याचे काम सुरू केले.
मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांबरोबरच पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून जावे लागते. नवीन रस्ता होईपर्यंत रस्त्यावरील खड्डे मुजविण्याबाबत सूचना करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका अधिकारी लोकप्रतिनिधींचेसुद्धा ऐकत नसल्याचे चित्र आहे. आंदोलनाची दखल घेत महापालिकेने लागलीच रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली.
शिवाजीरोडसाठी मिरज शहर सुधार समितीने अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर आमदार सुरेश खाडे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २९ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर केला आहे. काम सुरू होण्यास किमान सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे. पावसाळ्यात किमान खड्डे मुजवून रस्ता तात्पुरता दुरुस्त करण्याची मागणी समितीने खासदार संजयकाका पाटील व आमदार खाडे यांच्याकडे केली आहे, मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका अधिकारी लोकप्रतिनिधींच्या सूचनांना केराची टोपली दाखवत असल्याने समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांच्या नावे शंखध्वनी आंदोलन केले.
आंदोलनात समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष शंकर परदेशी, मुस्तफा बुजरूक, धनराज सातपुते, बाळासाहेब पाटील, विराज कोकणे, बंडू शेटे, विलास देसाई, किरण बुजगडे, प्रा. विजय धुमाळ, श्रीकांत महाजन, असिफ निपाणीकर, राकेश तामगावे, संतोष माने, अनिल देशपांडे, सचिन गाडवे, शाहीद सतारमेकर, जहीर मुजावर आदी सहभागी झाले होते. महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून तात्काळ खड्डे मुजविण्याचे काम सुरू केले.