पडळकरांच्या हद्दपारीचा प्रस्ताव रद्द

By Admin | Updated: September 4, 2014 00:02 IST2014-09-03T23:50:13+5:302014-09-04T00:02:31+5:30

पोलिसांना चपराक : प्रांताधिकाऱ्यांनी दिला निर्णय

Proposal for Padalkar's removal cancellation | पडळकरांच्या हद्दपारीचा प्रस्ताव रद्द

पडळकरांच्या हद्दपारीचा प्रस्ताव रद्द

आटपाडी : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध आटपाडी पोलिसांनी सादर केलेला हद्दपारीचा प्रस्ताव प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी रद्द केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी इथापे यांनी दिलेल्या या निकालाने आटपाडी पोलिसांना चपराक बसल्याचे, तर काही प्रस्थापित राजकारण्यांना दणका बसल्याचे मानले जात आहे.
‘रासप’चे गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध आटपाडी पोलिसांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ प्रमाणे सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करणे आणि त्यांनी या प्रदेशात फिरू नये, असा प्रस्ताव प्रांताधिकारी इथापे यांच्याकडे सादर केला होता.
पडळकर यांच्याविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात मारामारी, दरोडा, नुकसानी, धमकी आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे असे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय बेकायदेशीर जमाव जमवून ओगलेवाडी (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथील टेंभू योजनेचे कार्यालय फोडणे, राजेवाडी तलावाचा कालवा फोडणे, दुचाकींची रॅली काढणे, पोलिसांनी परवानगी दिलेल्या ठिकाणापेक्षा वेगळ्या ठिकाणी सभा घेणे, असे गुन्हे दाखल आहेत.
हद्दपारीच्या प्रस्तावात पोलिसांनी पडळकर यांच्याविरुद्ध तुम्ही लहान-थोर व्यक्तींवर दबाव टाकीत असता, तसेच पक्षातील सहकार्याच्या मदतीने स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लोकांना दमदाटी करणे, नुकसान करणे, वेळप्रसंगी लोकांवर हल्ला करणे, शासकीय कामात अडथळा आणणे असे प्रकार करीत असता, त्यामुळे आटपाडी, झरे, विभूतवाडी आणि वरकुटे (ता. माण, जि. सातारा) या परिसरात दहशत निर्माण झाल्याचा आरोप केला होता. समाजातील शांतता व सुव्यवस्था बिघडू शकते. यासाठी हद्दपारीची कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती.
आता प्रांताधिकारी इथापे यांनी निकाल देताना पडळकर यांच्यावरील गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. काही गुन्हे सध्या तपासावर आहेत. त्यांना कोणत्याही गुन्ह्यात अद्याप शिक्षा झालेली नाही, असे नमूद करुन प्रस्ताव रद्द केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Proposal for Padalkar's removal cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.