शासकीय रुग्णालयाचा प्रस्ताव लाल फितीत
By Admin | Updated: December 2, 2014 00:19 IST2014-12-01T23:26:36+5:302014-12-02T00:19:34+5:30
तासगावकरांची गैरसोय : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

शासकीय रुग्णालयाचा प्रस्ताव लाल फितीत
अमित काळे - तासगाव शहरात सुसज्ज, सर्व सोयींनीयुक्त असे शासकीय रुग्णालय बांधण्याचा विषय आता केवळ चर्चेपुरता आणि कागदावरच राहिला आहे. २००८ पासून पालिकेने
ठराव करून दिलेला जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव लाल फितीत अडकला आहे. नवीन तर सोडाच, परंतु असलेले महिला प्रसुती केंद्रही बंद झाल्याने अनेकांच्या गैरसोयीत भरच पडली आहे. या प्रश्नाकडे सर्वच स्तरावरच्या लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले कस्तुरबा प्रसुतीगृह आॅगस्ट २०१० पासून बंद आहे. त्याची इमारतही जुनी झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे. मिरज
वैद्यकीय महाविद्यालयाचे हे प्रशिक्षण केंद्र तासगावात बऱ्याच
वर्षांपासून सुरू असून या केंद्राच्या माध्यमातून हे रुग्णालय सुरू होते. त्याकाळी २५ खाटांचे सुसज्ज असे हे रुग्णालय होते. याचा लाभ असंख्य गोरगरीब, सामान्य कुटुंबातल्या लोकांना झाला.
१९६७ पासून या केंद्राकडे हे रुग्णालय आले. सुमारे ५३ वर्षे अविरतपणे या रुग्णालयाने तासगावकरांची सेवा केली. इमारत जुनी झाली, तंत्रज्ञान बदलले, लोकसंख्या वाढली. या पार्श्वभूमीवर नवीन सुसज्ज रुग्णालय होणे अपेक्षितच आहे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी याबाबत मंत्रालयात बैठक घेतली होती. या बैठकीला नगरसेवक हजर होते. नगरविकास मंत्र्यांबरोबर या नव्या (कल्पनेतल्या) रुग्णालयाबाबतच्या चर्चा झाल्या. पण त्या केवळ चर्चाच राहिल्या.
शहरापासून लांब असलेल्या ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीची सोय आहे. पण या रुग्णालयात जायला रात्री-अपरात्री वाहनांची सोय नाही. कोणतीही वस्तू आणायची असेल, तर शहरात येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. वाहन नसलेल्या वृद्ध, महिलांना तर याचा खूपच त्रास होतो. याकडे तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी तालुकावासीयांतून सातत्याने होत आहे.
पालिकेकडून जागा देण्याचा ठराव
तीनमजली, सुसज्ज असे शासकीय रुग्णालय बांधायची चर्चा झाली. २००८-०९ मध्ये तत्कालीन आरोग्य उपसंचालकांनीही या रुग्णालयाला भेट दिली होती. प्रस्ताव करण्याचेही ठरले. परंतु पुढे काय झाले? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. शासनाच्या निर्देशानुसार तासगावच्या नगरपरिषदेने जागा देण्याबाबतचा ठरावही करुन दिला.